प्रशासकीय अधिकारी 'निधी चौधरी' यांच्या चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे २२ जुनपर्यंत.
प्रशासकीय अधिकारी म्हणून चोख सेवा बजावताना आपल्या कलागुणांची जपणूक करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आले आहे. ' व्हिस्पर्स ऑफ द वुड्स : अब्स्ट्रॅक्ट इंप्रेशन्स' या नावाने सुरू असलेले हे चित्र प्रदर्शन २२ जूनपर्यंत पाहता येणार आहे.
प्रशासकीय अधिकारी सौ. निधी चौधरी या २०१२ च्या बॅचच्या अधिकारी असून सध्या त्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय (NGMA), मुंबई येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत. मूळच्या राजस्थानच्या, मारवाड प्रांतातून आलेल्या निधी चौधरी यांचे निसर्गाशी कलेच्या रूपात अनोखे नाते जोडले गेले आहे. ज्या मारवाडमध्ये ३६३ बिष्णोईंनी वृक्षतोड होऊ नये आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा, यासाठी बलिदान दिले, अशा ठिकाणी लहानाच्या मोठ्या झालेल्या निधी चौधरी यांनी निसर्गाचे पावित्र्य आणि पुढे कामाच्या निमित्ताने शहरात आल्यानंतर जाणवलेले निसर्गातील बदल जवळून अनुभवले आहेत. निसर्गप्रति असलेल्या या संवेदना, विशेषतः आपल्याकडच्या वृक्षराजींचे महत्त्व, त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या कथा आणि मानवतेशी असलेले त्यांचे नाते याची अभिव्यक्ती त्यांनी ' व्हिस्पर्स ऑफ द वुड्स : अब्स्ट्रॅक्ट इंप्रेशन्स' या चित्रप्रदर्शनातून केली आहे.
या प्रदर्शनातील चित्रे सेमी-अॅबस्ट्रॅक्ट शैलीतील असून त्यात भारतीय, ग्रीक, इजिप्शियन अशा प्राचीन संस्कृतींमध्ये झाडांना दिले गेलेले महत्त्व अधोरेखित करतानाच आजच्या काळात पर्यावरणाकडे झालेल्या दुर्लक्षाकडेही त्यांनी या चित्रांमधून लक्ष वेधले आहे. 'हे माझ्यासाठी केवळ एक कला प्रदर्शन नाही, तर ही एक जनजागृतीची मोहिम आहे. विविध रंगसंगतींमधून आणि प्रतिकात्मक शैलीतून मी प्रेक्षकांना थोडं थांबून निसर्गाशी असलेल्या त्यांच्या नात्याचा नव्याने विचार करायला प्रवृत्त करू इच्छिते,' अशा भावना निधी चौधरी यांनी व्यक्त केल्या. प्रशासकीय कौशल्य, हुशारी आणि सर्जशील अभिव्यक्ती यांचा अद्भुत संगम असलेले हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीतील हिरजी आर्ट गॅलरी या दालनात २२ जूनपर्यंत सुरू राहणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा