‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा....सामाजिक भान जपणारे दिग्दर्शक अरविंद भोसले यांची नवी कलाकृती.

   स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी मांडणी झाली ती नाट्य सादरीकरणातून. रवींद्र नाट्यमंदिरातल्या रंगमंचावर रंगलेल्या बहारदार पथनाट्याने रसिकांची मने जिंकली.  चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्वच्छतेचं  पथनाट्य सादर करीत पहिल्यांदाच अनोख्या पद्धतीने 'अवकारीका' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा रंगला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ, तसेच अनेक मान्यवर  उपस्थित  होते.  या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस महासंचालक  मा. श्री कृष्णप्रकाशजी आवर्जून उपस्थित होते. 
     रेडबड मोशन पिक्चर या बॅनर अंतर्गत 'अवकारीका' हा मराठी चित्रपट येत्या १ ऑगस्टला  प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ आहे. या चित्रपटाचे  दिग्दर्शन अरविंद भोसले यांचे आहे. चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर, अरुण जाधव यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे.
    चित्रपट मनोरंजनाचे माध्यम असले तरी त्यातून समाजप्रबोधन होणे आवश्यक असतं. देशातील सामाजिक समस्यांबाबत लोकांना जागरूक करणे हे  साहित्यिक, कलाकार यांचे आद्य कर्तव्य आहे. आपल्यासमोर उभ्या ठाकणार्‍या प्रश्नांना आपणच तोंड द्यायचं आहे, हे लक्षात येऊन  एका एका  महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाची जाणीव  करून देण्यासाठी एकत्र आलेल्या ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमच्या विलक्षण प्रयत्नांना दाद देत या चित्रपटाला अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. कृष्णप्रकाश यांनी  मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
   स्वच्छते बाबतच्या अनास्थेच्या प्रश्नावर फक्त हळहळण्या व्यतिरिक्त समाजात फारशी कृती घडताना कधी दिसत नाही. व्यथित करणारी समाजातील हीच गोष्ट अरविंद भोसले या सर्जनशील दिग्दर्शकाच्या मनात खोलवर रुजते आणि त्यातून एका चित्रपटाची कथा जन्म घेते स्वच्छतादूतांच्या परिस्थितीने व्यथित झालेल्या या दिग्दर्शकाच्या ‘अवकारीका’ या चित्रपटातून याचे प्रतिबिंब न उमटते तरच नवल. समाजाकडून दुर्लक्षिलेला स्वच्छता आणि स्वच्छतादूत यांचे आयुष्य हा  नाजूक विषय ‘अवकारीका’ चित्रपटातून त्यांनी समाजासमोर मांडला.  सफाई कामगारांच्या आयुष्यात सकारात्मक दिशेने  बदल व्हावे या उद्देशाने  मी हा चित्रपट आणला असून हा विचार प्रत्येकापर्यंत  पोहचेल असा विश्वास दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी व्यक्त केला.   
    ‘स्वच्छता हा आज एक जागतिक प्रश्न झाला आहे. वेळीच आपण आपली जबाबदारी घेतली नाही तर मोठ्या संकटाला आपल्या सामोरं  जावं  लागेल. या चित्रपटाच्या निमित्ताने  दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी ही जबाबदारी घेतली मला ती महत्त्वाची वाटली’. सामाजिक भान जपण्याचा आणि एका चांगल्या  प्रोजेक्टचा भाग  होता आल्याचा आनंद अभिनेता विराट मडके  यांनी यावेळी  व्यक्त केला.     
    दैनंदिन आयुष्याशी निगडीत असलेला एक अत्यंत महत्त्वाचा विषय मांडणारा, 'अवकारीका’ हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे  आम्हाला गरजेचे वाटले समाजाला एक नवा दृष्टिकोन आपल्याला देता येईल म्हणून आम्ही हा  चित्रपट मोठ्या पडद्यावर घेऊन आलो आहोत. त्याला प्रेक्षकांचा नक्की सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा  विश्वास निर्मात्यांनी यावेळी व्यक्त केला.  
    या चित्रपटात अभिनेता विराट मडके स्वच्छता दूताच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत या चित्रपटात राहुल फलटणकर, रोहित पवार, विनोद  खुरंगळे, पिया कोसुम्बकर, नितीन लोंढे, प्रफुल्ल कांबळे, स्नेहा बालपांडे तसेच बालकलाकार वैभवी कुटे, उन्नती माने, कार्तिकी बट्टे, आदि कलाकार मंडळी दिसणार आहेत.
    चित्रपटाची कथा-पटकथा,संवाद,गीते अरविंद भोसले यांची आहेत. छायांकन करण तांदळे तर संकलन अथर्व मुळे यांचे आहे.  सहदिग्दर्शक रेहमान पठाण तर कार्यकारी निर्माता चेतन परदेशी आहेत. संगीत श्रेयस देशपांडे यांचे असून गायक कैलास खेर, सुनिधी चौहान, ज्ञानेश्वर  मेश्राम यांचे स्वर चित्रपटातील गीतांना लाभले आहेत. कलादिग्दर्शक शैलेश रणदिवे आहेत.
    रेडबड मोशन पिक्चरचा अरविंद भोसले दिग्दर्शित 'अवकारीका' हा मराठी चित्रपट येत्या१ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...