‘घाशीराम कोतवाल’ हिंदी रंगभूमीवर...ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा मध्यवर्ती भूमिकेत.

ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे  मराठी  आणि  भारतीय  रंगभूमीवरचं अत्यंत  महत्त्वाचं नाटक. ‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग होऊन (१६ डिसेंबर १९७२) आज ५२ वर्ष पूर्ण झाली आहेत.  हे नाटक आजवर सुमारे दहा भारतीय भाषांमधून आणि जगातील तीन भाषांमध्ये सादर झाले आहे. मात्र, हिंदीत हे नाटक व्यावसायिकदृष्ट्या सादर केले गेले नाही. त्यामुळे अभिजात कलाकृतीचं हे कालातीत नाटक हिंदी भाषकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदी रंगभूमीवरही सादर करण्याचा निर्णय घेत लेखक-दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल यांनी या हिंदी नाटकाचे शिवधनुष्य पेलले आहे. या नाटकाची पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे, ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय  मिश्रा, दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल, नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर आदि मान्यवर उपस्थित  होते.
    यावेळी बोलताना ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा म्हणाले की , ‘नाटक  करण्याची फार मनापासून इच्छा होती परंतु  चित्रपटांमुळे वेळ मिळत नव्हता. 'घाशीराम कोतवाल’ अभिजात कलाकृतीचं हे कालातीत नाटक आणि त्याचा अवकाश फार मोठा आहे. असं नाटक करायला मिळतंय हे नट  म्हणून मला समृद्ध करणार होत. त्यामुळे उत्तम असा टीमसोबत हे जुळून आल्यानंतर मी होकार दिला’. एकीकडे मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी आणि ओटीटी सारखी नवीन माध्यमं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असताना नाटकांनी प्रेक्षकांच्या मनात आपली जागा कायम राखली आहे. मराठी नाटकात आजच्या विवंचना, आनंद, संघर्षाचे प्रतिबिंब दिसते. मराठी रंगभूमी एक प्रवाह आहे आणि या प्रवाहाचे मुख्य माध्यम म्हणून नाटकांकडे पहायला हवे ,असेही ते म्हणाले.
   या नाटकाला शुभेच्छा देताना अभिनेता मकरंद देशपांडे म्हणाले की, नाटक जिवंत करण्याचं काम नट करत असतो. त्यातही  ‘घाशीराम कोतवाल’ सारखं अजरामर नाटक आणि त्यातली भूमिका  हे आव्हानच.  हे आव्हान संजय मिश्रा  सारखा कसलेला नट आणि अभ्यासू दिग्दर्शक अभिजित पानसे अशी मंडळी येऊन करतायेत ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. अशा कलाकृती प्रेक्षकांपर्यंत  पोहचणं मला अधिक महत्त्वाचं वाटतं.  
   ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक अमराठी प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याच्या हेतून आम्ही ते हिंदीत सादर करीत असल्याचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी यावेळी नमूद केले. मूळ नाटकात नृत्य व संगीताला महत्त्वाचे स्थान होते, ते लक्षात घेऊन या नाटकाचा बाज आजच्या काळाला अनुसरुन सादरीकरणाच्या दृष्टीने लाइव्ह संगीत १२ ते १५ वाद्यांचा संच  मराठी लावणी आणि कव्वाली असा नजराणा या  नाटकात असल्याचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी यावेळी सांगितले.  
   नाटक हे महाराष्ट्रातील कित्येक पिढयांचे व्यक्त होण्याचे माध्यम राहिले आहे. अशावेळी भाषेच्या सीमेपलीकडे जाणारे हे कालातीत नाटक हिंदीत आणण्याचा आनंद दिग्दर्शक भालचंद्र कुबल यांनी व्यक्त केला.   
   हिंदीमध्ये येणारे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक आकांक्षा माळी यांच्या ‘३३ एएम स्टुडिओ’, अनिता पालांडे आणि दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या रावण फ्युचर प्रोडक्शनतर्फेसादर होणार आहे. संजय मिश्रा, संतोष जुवेकर, उर्मिला कानिटकर या  कलाकारांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या नाटकाचा  शुभारंभ  १४ ऑगस्ट  बालगंधर्व रंगमंदिर बांद्रा येथे रात्रौ ८.०० वा. रंगणार आहे. त्यानंतर पुढील प्रयोग १५ ऑगस्ट बालगंधर्व रंगमंदिर बांद्रा येथे रात्रौ ८.०० वा. व २३ ऑगस्ट टाटा थिएटर एनसीपीए, येथे रात्रौ ८.०० वा. होणार आहे.  ६० कलाकारांचा संच नाटकात काम करणार आहे.
   हिंदी नाटकाची संहिता हिंदीतील प्रसिद्ध लेखक कवी प्रा. वसंत देव यांनी लिहिली आहे. पेशवेकालीन इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या या नाटकातून तेंडुलकरांनी वर्तमानकालीन राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. सत्ताधारी नाना फडणवीस घाशीराम कोतवालाला आपल्या मर्जीनुसार खेळवतो, त्याच वेळी समाजालाही खेळवतो. वेगवेगळ्या क्षेत्रात या घाशीरामाचे दर्शन आपल्याला प्रत्यही घडत असते, क्रौर्यतेच्या परिसीमेचे असे दर्शन घडवणार हे नाटक त्या दृष्टीने कालातीत आहे असे म्हणता येईल.  
   नाटकातील गीते प्राध्यापक अशोक बागवे, चंद्रशेखर सानेकर, सुनिता शुक्ला त्रिवेदी व मंदार देशपांडे यानी लिहिली आहेत. तसेच  नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून, नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर तर संगीत मंदार देशपांडे यांचे आहे. प्रकाश योजना हर्षवर्धन पाठक तर वेशभूषा व वस्त्रसंकल्पना अभिजित पानसे, वस्त्रकौशल्य चैत्राली डोंगरे तथा वस्त्रनिर्मिती बळवंत काजरोळकर यांची आहे. निर्मिती प्रमुख मंदार टिल्लू असून व्यवस्थापनाची जबाबदारी  संतोष महाडिक यांनी सांभाळली आहे.
    या नाटकाचे प्रयोग नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने नरीमन पॉईंट येथील टाटा थिएटर मधे होणार असून कार्यकारी अधिकारी राजेश्री शिंदे यांनी या सहकार्याबाबत आपला आनंद व्यक्त करत म्हटलं आहे, “घाशीराम कोतवालच्या निर्मितीशी जोडले गेलो आहोत याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. विजय तेंडुलकर यांचे प्रतिष्ठित नाटक घाशीराम कोतवालच्या नव्या सादरीकरणाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये चांगलीच वाढीस लागली आहे.”

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...