'फकिरीयत'मधील 'चलो चले...' संतोष जुवेकरचे गाणे प्रदर्शित.

   'फकिरीयत' हा आगामी हिंदी चित्रपट संगीतप्रेमींसाठी आध्यात्मिक गीत-संगीताची अनोखी मेजवानी घेऊन आला आहे. या चित्रपटातील गाणी मनामनांत भक्तीभावाची ज्योत प्रज्ज्वलित करणारी ठरणार असल्याची झलक नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फकिरीयत'मधील एका नवीन गाण्यात पाहायला मिळते. 'फकिरीयत' हा चित्रपट आध्यात्म, गुरूभक्ती, क्रियायोग आणि श्रद्धा यांची प्रचिती देत जीवनाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. या चित्रपटातील 'चलो चले हम बाबाजी के देस...' हे गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे.

भद्रबाहू डिव्हाइन क्रिएशन्स एलएलपीच्या बॅनरखाली 'फकिरीयत' चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला 'फकिरीतय' हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. ‘चिरुट जलती है’ आणि ‘अध्यात्म एक विद्रोह, एक क्रांती’ या अनुजा जानवलेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर या चित्रपटाची कथा आधारलेली आहे. 'फकिरीयत'ची पटकथा अनिल पवार यांनी लिहीली असून, अनुजा जानवलेकर यांच्यासोबत पवार यांनी संवादही लिहिले आहेत. 

गुरूमाई माँ रुद्रात्मिका यांच्या आध्यात्मिक प्रवासावर आधारलेल्या या चित्रपटात महावतार बाबाजींच्या महतीसोबतच गुरुमाई माँ रुद्रात्मिका यांचा त्यांच्या गुरु कार्यासाठीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. प्रदर्शित करण्यात आलेले 'चलो चले हम बाबाजी के देस...' हे गाणे उत्तराखंडमधील नयनरम्य लोकेशन्सवर चित्रित करण्यात आले आहे. 'चलो चले...'चा सूर आळवत हाताने टाळी आणि मुखाने मानस्मरण करीत श्री महावतार बाबाजींचे भक्तगण एकत्र येतात. भक्तांच्या या घोळक्यात अभिनेता संतोष जुवेकरही सामील होताच 'चलो चले हम बाबाजी के देस...' हे गाणे सुरू होते. उंचच उंच पर्वतरांगांमधून वाट काढत पायी जाणारे भक्तीरसात तल्लीन झालेले बाबाजींचे शिष्यगण गाण्यात आहेत. समृद्धी पवार यांच्या लेखणीतून अवतरलेल्या या गाण्यातील शब्द मनाला भिडणारे असून, आध्यात्मिक अनुभूती देणारे आहेत. त्यावर संगीतकार प्रवीण कुंवर यांनी सुमधूर संगीताचा साज चढवला आहे. मनोज मिश्रा आणि डॅा. नेहा राजपाल यांनी हे गाणे गायले आहे.

संत विचारांचा अनमोल नजराणा घेऊन आलेल्या 'फकिरीयत'मध्ये दीपा परब, उदय टिकेकर, संदेश जाधव, विनीत शर्मा, अक्षय वर्तक, नयन जाधव, संदेश जाधव, अनीषा सबनीस आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. डिओपी अजित रेड्डी यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, निलेश गावंड यांनी संकलन केले आहे. गीतकार समृद्धी पवार यांनी लिहिलेली गीते संगीतकार प्रवीण कुंवर यांनी संगीतबद्ध केली आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...