२२ वर्षे नेटाने महोत्सव करणे हे कौतुकास्पद: प्रशांत साजणीकर.
गेला आठवडाभर रंगलेल्या २२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा नुकताच संपन्न झाला. यंदाच्या आशियाई चित्रपट महोत्सवात वैविध्यपूर्ण चित्रपटांची मेजवानी देत रसिकांना आशियाई चित्रपट संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. सुमारे ५६ चित्रपटांचा आस्वाद रसिकांना यात घेता आला. महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जगातल्या उत्तम चित्रपटांचा आस्वाद अशा महोत्सवांमधून घेता येत असतो. चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी महोत्सवांप्रमाणे वेगवेगळ्या स्तरावर मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज प्रशांत साजणीकर यांनी यावेळी बोलून दाखविली. शहराप्रमाणे ग्रामीण भागात चित्रपट पोहचणे गरजेचं असल्याचं सांगत, शासन वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. याच प्रयत्नांचा भाग म्हणून दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळानेच जुन्या चित्रपटांसाठी विशेष उपक्रम सुरू केला आहे. त्याचप्रमाणे नवोदित कलाकरांना व्यासपीठ उपलब्ध करून देत तीन वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस सुरु करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. २२ वर्ष नेटाने महोत्सव करणे हे कौतुकास्पद असल्याचे सांगत ‘थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवा’ च्या आयोजकांचे आभार मानत प्रशांत साजणीकर यांनी शासन चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करताना महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी महोत्सवासाठी सहकार्य लाभलेल्या सर्वांचे आभार मानले आणि मिळालेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. अनेकांच्या प्रयत्नांनी, सहकार्याने हा महोत्सव यशस्वी झाला असून महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी महोत्सवाचे कार्यकारिणी सदस्य श्रीकांत बोजेवार, फेस्टिवल दिग्दर्शक संतोष पाठारे, संदीप मांजरेकर यांसह दिग्दर्शक संदीप सावंत, प्रबल खौंद, विकास पाटील सुप्रतिम भोल आदि ज्युरी मेंबर सुद्धा यावेळी उपस्थित होती.
कै. सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षीचा चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार चित्रपट अभ्यासक आणि क्युरेटर मिनाक्षी शेड्डे यांना प्रदान करण्यात आला. "कै. सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मला मिळालेल्या अवॉर्डबद्दल मी खरंच कृतज्ञ असून माझ्या लेखन कारकिर्दीसाठी सुधीर नांदगावकर यांचं खूप मोलाचं योगदान राहिलं आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा हा पुरस्कार घेताना मला खूप आनंद होतो आहे अशा भावना मिनाक्षी शेड्डे यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या."
यंदाच्या चित्रपट स्पर्धा विभागात नव्या दमाच्या दिग्दर्शकांच्या नव्या पद्धतीची मांडणी करणारे चित्रपट रसिकांना पहायला मिळाले. फेस्टिव्हल मध्ये दाखविण्यात आलेल्या चित्रपट स्पर्धेचा निकाल ही यावेळी जाहीर करण्यात आला. इंडियन सिनेमा विभागात ‘बॅलड टू द विंड्स’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार ‘रोमँटिक अफेयर्स' या चित्रपटासाठी दिग्दर्शक मोंजुल बरुआ यांना मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेता मनोज शुक्ला (बॉडी), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कासवी सोनकोरिसन (रोमँटिक अफेयर्स) ठरले.
दिग्दर्शक रुद्रजित रॉय (पिंजर- द केज), अभिनेता बोलोराम दास (रोमँटिक अफेयर्स), दिग्दर्शकीय पदार्पण डॉ.ओंकार भाटकर (द वेट ऑफ लाँगिंग), अभिनेत्री (गौमाया गुरुंग- शेप ऑफ मोमो) यांना विशेष ज्युरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त यावर्षीपासून सुरु करण्यात आलेला उत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण हा पुरस्कार त्रिबेणी राय (शेप ऑफ मोमो) यांनी पटकावला.
समकालीन मराठी चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान ‘साबर बोंड’ या चित्रपटाने मिळवला, तर याच चित्रपटासाठी रोहन कानवडे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. यासोबत गोंधळ चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांनीही या पुरस्कारावर आपले नाव कोरले. भूषण मनोज, सुरज सुमन यांना ‘साबर बोंड’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराच्या मानकरी रेणुका शहाणे (उत्तर) भक्ती घोघरे, (गिरण) ठरल्या. विशेष ज्युरी पुरस्काराचा सन्मान दिग्दर्शक रावबा गजमल (सांगला), कथेसाठी मनोज नाईक-साटम (गमन), बालकलाकार देवदत्त घोणे (सोहळा) यांनी मिळवला.
फेस्टिव्हलचा आढावा संतोष पाठारे यांनी घेतला तर संदीप मांजरेकर यांनी आभार व्यक्त केले. २२ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग,महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एनएफडीसी यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा