महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे ‘चित्रपताका’त्रैमासिक प्रकाशित.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने निर्मित व प्रकाशित केलेल्या ‘चित्रपताका’ या पहिल्या त्रैमासिकाचे प्रकाशन बुधवार, १ एप्रिल २०२६ रोजी संपादक तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’या विषयावर आधारित हे मासिक असून जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या अंकात मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रीविश्व, स्त्रीप्रतिमा आणि स्त्रीच्या सर्जनशील सहभागाचा वेध घेणारे लेख समाविष्ट केले आहेत.
सिनेमा हा केवळ मनोरंजनाचा उद्योग नसून तो समाजाच्या भावविश्वाचा आरसा आहे. म्हणूनच या माध्यमाभोवती घडणाऱ्या चर्चांना आणि विचारमंथनाला एक सर्जनशील व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सिनेमा या व्यापक कलामाध्यमाभोवती घडणारे विचारप्रवाह, त्यासंबंधीचे अनुभव आणि स्मृती यांविषयीचा रचनात्मक संवाद घडावा या उद्देशाने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून ‘चित्रपताका’ हे त्रैमासिक सुरू करण्यात आले आहे. या त्रैमासिकाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीतील बदलते प्रवाह, नव्या पिढीचे प्रयोग, सिनेउद्योगासमोरील आव्हाने आणि संधी, तसेच या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांचे अनुभव आणि चिंतन वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या त्रैमासिकाचे कार्यकारी संपादक आणि प्रकाशक तथा सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी जबाबदारी पार पाडली आहे. तसेच मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, वित्तीय सल्लागार मुख्यलेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, विशेष कार्यकारी अधिकारी सुचित्रा देशपांडे यांनी संपादकीय सल्लागार जबाबदारी सांभाळली आहे.
‘चित्रपताका’ त्रैमासिकाच्या पहिल्या अंकात
मराठी चित्रपटांमधील स्त्री-पात्रांच्या बदलत्या प्रवासाचा आढावा घेणारा लेख या अंकात आहे. समाजातील बदलते संदर्भ, स्त्रीस्वातंत्र्याच्या संकल्पना आणि बदलती मूल्यव्यवस्था यांचा प्रभाव मराठी चित्रपटांतील स्त्रीप्रतिमांवर कसा उमटत गेला, याचे सूक्ष्म निरीक्षण या लेखातून समोर येते. याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्री-दिग्दर्शकांच्या योगदानाचा अभ्यासपूर्ण आढावा घेणारा लेखही या अंकात वाचायला मिळेल. दिग्दर्शनासारख्या सर्जनशील आणि नेतृत्वात्मक क्षेत्रात महिलांनी केलेल्या कामाचा मागोवा घेताना त्यांच्या कलात्मक दृष्टीचा, प्रयोगशीलतेचा आणि अभिव्यक्तीच्या वैविध्याचा परामर्श घेतलेला लेख या अंकात वाचता येईल. प्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम हिची मुलाखत, प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी चित्रनगरीबद्दल जागवलेल्या आठवणी या अंकात वाचता येतील. त्याचबरोबर बर्लिनच्या चित्रपट महोत्सवाचा प्रवास, मंथन उपक्रमाचा आढावा, या अंकात घेण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा