गंमत म्हणून दिलेला तो होकार आयुष्य बदलणाऱ्या प्रवासाची सुरुवात ठरेल असे वाटले नाही - समीर खांडेकर.
एका वेगळ्या प्रोजेक्टच्या मिटिंगसाठी मी एका कॉफी शॉपमध्ये गेलो होतो. तो प्रोजेक्ट तर झाला नाही. पण बाजूच्याच टेबलावर मला माझा मित्र आणि प्रभात थिएटर्स चा निर्माता हर्षद कठापूरकर भेटला आणि त्याने मला "बनवाबनवी" नाटक लिहिण्यासाठी आणि दिग्दर्शन करण्यासाठी विचारलं!गंमत म्हणून दिलेला तो होकार आयुष्य बदलणाऱ्या प्रवासाची सुरुवात ठरेल, याची तेव्हा कल्पनाही नव्हती.
गेली १५ वर्षं अभिनेता म्हणून रंगभूमीवर काम करताना मला वाटायचं की नाटक कसं घडतं हे मला पूर्णपणे माहिती आहे. पण "बनवाबनवी"ने माझ्या अनेक ठाम समजुती अक्षरशः मोडून काढल्या. मुहूर्ताच्या दिवशी माझ्यासमोर फक्त एकच गोष्ट होती. एका कोऱ्या कागदावर लिहिलेलं "बनवाबनवी" हे नाव. कथा नव्हती.पात्रं नव्हती.संवाद नव्हते.होतं फक्त एक स्वप्न...आणि ते सत्यात उतरवण्याची जिद्द.
मराठी रंगभूमीवर कंटेंट क्रिएटर्सना केंद्रस्थानी ठेवून उभं राहणारं हे पहिलंच नाटक. शंतनू रांगणेकर वगळता बाकी सर्व कलाकार माझ्यासाठी नवीन होते आणि मी त्यांच्यासाठी. सगळेजण मला विचारत होते ,"सर, माझं पात्र कसं आहे?""माझा रोल काय आहे?"आणि माझ्याकडे उत्तर म्हणून फक्त एकच गोष्ट होती..."थोडा विश्वास ठेवा. पण त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती,अटळ जिद्द! आणि तिथून सुरू झाला "बनवाबनवी"चा खरा प्रवास.
लाखो फॉलोअर्स असलेले हे कंटेंट क्रिएटर्स नाटकासाठी अक्षरशः झोकून देऊन काम करू लागले. सोशल मीडियावर लाखो लोकांचं मनोरंजन करणारी ही मंडळी रंगमंचावरच्या प्रत्येक क्षणासाठी पुन्हा नव्यानं विद्यार्थी झाली. हा प्रवास थोडक्यात सांगणं अशक्य आहे. कारण या प्रवासात भेटलेली प्रत्येक व्यक्ती स्वतःमध्ये एक स्वतंत्र कथा होती...
दिग्दर्शक म्हणून मी त्यांना घडवत होतो,पण खरं सांगायचं तर तेही मला तितकंच घडवत होते कारण यातला विनोद हा माझ्या नियमीत शैलीतला विनोद नाहीय परंतू तरीही लेखक/ दिग्दर्शक म्हणून नाटक बांधतांना या कंटेन्ट क्रिएटर्स च्या विनोदाची शैली लक्षात घेऊनच त्या पद्धतीचा विनोद या नाटकात हेतु पुरस्सर लिहिला गेला. या सगळ्या प्रवासात, ६० दिवसांच्या तालमींसाठी कोणतीही तक्रार न करता वेळ, विश्वास आणि स्वातंत्र्य देणारे प्रभात थिएटर्सचे निर्माते निखिल करंडे आणि हर्षद कठापूरकर..असे निर्माते मिळणं हे प्रत्येक दिग्दर्शकासाठी भाग्याची गोष्ट असते.पण या नाटकाचं सगळ्यात मोठं यश काय?तर नाटक पाहायला आलेला जवळपास ७०% प्रेक्षक आयुष्यात पहिल्यांदाच रंगमंचावरचं नाटक पाहतोय.ते कदाचित त्यांच्या आवडत्या कंटेंट क्रिएटरला पाहायला आले असतील...पण जर त्या निमित्ताने त्यांची रंगभूमीशी नाळ जोडली गेली, तर माझ्यासाठी त्याहून मोठं यश नाही.कारण नवीन पिढी नाटकाकडे वळावी म्हणून असंख्य रंगकर्मी अनेक वर्षं अविरत मेहनत घेत आहेत.त्या प्रयत्नात "बनवाबनवी"ने जर का एक छोटासा खारीचा वाटा उचलला असेल...तर तो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा