रंगभूमीवर होणार 'शिक्कामोर्तब' ........
नावात काय आहे असे म्हटले जात असले, तरी नावातच बरेचकाही असते आणि हेच सिद्ध करणारे एक नवीन नाटक रंगभूमीवर 'शिक्कामोर्तब' करायला येत आहे. 'शिक्कामोर्तब' असेच या नाटकाचे नाव असून या नाटकात सागर कारंडे, कांचन पगारे, भक्ती रत्नपारखी व अनिशा सबनीस असे आजचे आघाडीचे कलाकार भूमिका साकारत आहेत. एका आगळ्यावेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शुक्रवार, १२ जून रोजी दुपारी ४ वाजता विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे.
'तरंगिणी एंटरटेनमेंट' आणि 'नवनीत' निर्मित या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन प्रमोद शेलार यांनी केले आहे. नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून, प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. अभिजीत पेंढारकर यांनी संगीत दिलेल्या या नाटकासाठी वलय मुळगुंद यांनी गीते लिहिली आहेत. चंदर यांची रंगभूषा व दर्शना चौधरी यांची वेशभूषा नाटकाला लाभली आहे. महेंद्र खराडे हे निर्मिती प्रमुख आहेत. आता या नाटकातून नक्की काय पाहायला मिळणार, याची उत्कंठा वाढली आहे. सध्या या नाटकाच्या तालमी उत्साहात सुरू आहेत.
'शिक्कामोर्तब' या नाटकाविषयी माहिती देताना या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक प्रमोद शेलार म्हणतात, "ही एक खरी कहाणी आहे आणि तिला थोडेसे ट्विस्ट करून आम्ही रंगमंचावर आणत आहोत. हे नाटक 'हिट' असण्यावर लोक नक्कीच शिक्कामोर्तब करतील याची मला खात्री आहे. लेखक व दिग्दर्शक म्हणून एक वेगळ्या प्रकारचे नाटक देण्याचा मी प्रयत्न केला आहे. अशाप्रकारचा विषय आतापर्यंत रसिकांसमोर आलेला नाही. रसिकांना हे नाटक नक्कीच आवडेल याची आम्हाला खात्री आहे".
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा