शेतकऱ्यांच्या अश्रूंनी हादरला महाराष्ट्र; ‘द महाराष्ट्र फाईल’ चित्रपटातून वास्तवाचे दर्शन.
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या ‘द महाराष्ट्र फाईल’ या चित्रपटाने प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले आहे. धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांच्या जीवनकथेवर आधारित हा चित्रपट शेतकऱ्यांच्या वास्तववादी संघर्षाचे चित्रण करतो.
सत्ताधारी व्यवस्था शेतकरी आणि शेतीकडे कोणत्या दृष्टीने पाहते, तसेच राजकारणात शेतकऱ्यांचा कसा वापर केला जातो, याचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. सामाजिक विकासासाठी सर्व समाजघटकांना सोबत घेण्याची गरज अधोरेखित करताना बंजारा समाजाच्या समृद्ध संस्कृतीचाही विशेष उल्लेख चित्रपटात करण्यात आला आहे.
चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक संजीव कुमार राठोड यांनी या विषयाचे प्रभावी सादरीकरण करण्यात यश मिळवले आहे. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. मोठी स्टारकास्ट आणि अजय-अतुल यांच्या संगीतामुळे चित्रपटाला अधिक उंची मिळाली आहे.
‘सरकार’ आणि ‘विकास’ या संकल्पनांचा सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याशी किती मर्यादित संबंध असतो, हे चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. शेती आणि शेतकऱ्यांविषयीच्या प्रशासनाच्या उदासीनतेसह रस्ते प्रकल्पांसाठी संपादित होणाऱ्या जमिनींमुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य कसे विस्कळीत होते, याचे वास्तववादी चित्रण यात आहे.सामान्य माणूस मंत्रालयाची पायरी चढल्यानंतर त्याला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, आमदार निवास, मंत्रालय परिसरातील दलालांचे जाळे आणि प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी यांचेही चित्रपटात सखोल दर्शन घडते.या चित्रपटात सनी लिओनी, गौतमी पाटील यांचे लक्षवेधी गाणे या चित्रपटात आहे. उषा नाडकर्णी, वीणा जामकर यांसह अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट मराठवाड्यातील भीषण वास्तव प्रेक्षकांसमोर मांडतो.राज्यभरातून या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, लवकरच तो इतर भाषांमध्येही प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्माता-दिग्दर्शक संजीव कुमार राठोड यांनी दिली आहे. राठोड यांच्यासह संपूर्ण टीमने घेतलेले परिश्रम चित्रपटात स्पष्टपणे दिसून येतात.चित्रपटातील प्रत्येक गीत प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या स्पर्श करते आणि सामाजिक वास्तवावर विचार करण्यास भाग पाडते. हा केवळ एक चित्रपट नसून आपल्या समाजातील वास्तवाचे प्रतिबिंब असल्याची भावना अनेक प्रेक्षक व्यक्त करत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असून, मराठी चित्रपटसृष्टीत तो चर्चेचा विषय ठरत आहे. बंजारा समाजाच्या संस्कृतीला न्याय देणारा हा चित्रपट आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा