दोन इरसाल मित्रांची 'पत्रापत्री' रसिकांच्या प्रेमामुळे गाठली शंभरी.
मराठी सांस्कृतिक विश्वात गेल्या दोन वर्षांत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘पत्रापत्री’ या आगळ्यावेगळ्या साभिनय अभिवाचनाने आता १०० व्या प्रयोगाचा मानाचा टप्पा गाठला आहे. शब्दांची ताकद, भावनांची उब, दृकश्राव्य सादरीकरणाची देखणी साथ आणि दोन ज्येष्ठ कलावंतांची अप्रतिम जुगलबंदी यामुळे ‘पत्रापत्री’ने रसिकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या लेखणीतून जन्माला आलेल्या पत्रांच्या विश्वाला विजय केंकरे यांच्या कल्पक सादरीकरणाची जोड लाभली आणि त्यातून साकारला हा अनोखा प्रयोग. हे केवळ अभिवाचन नाही, तर शब्द, भावना आणि अभिनय यांचा सुरेख संगम असलेले साभिनय अभिवाचन आहे. दोन मित्रांमधील पत्रसंवादाच्या माध्यमातून उलगडणाऱ्या आठवणी, नात्यांतील जिव्हाळा, काळानुसार बदलणारे संदर्भ आणि मिश्किल विनोद यामुळे प्रत्येक प्रयोग रसिकांसाठी एक आत्मीय अनुभव ठरला आहे.
बदाम राजा प्रोडक्शन्स निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित पत्रापत्रीमध्ये एकूण पाच पत्रांचे अभिवाचन आहे. विशेष म्हणजे प्रत्येक प्रयोगात काही नवी पत्रे आणि नवे संदर्भ समाविष्ट केले जातात. त्यामुळे ‘पत्रापत्री’चा प्रत्येक प्रयोग हा तितकाच ताजा, जिवंत आणि समकालीन वाटतो. आजच्या सोशल मीडिया आणि झटपट संवादांच्या युगात पत्रांमधील भावना, शब्दांमधील ऊब आणि संवादातील प्रामाणिकपणा यांची आठवण करून देण्याचे महत्त्वाचे काम या प्रयोगाने केले आहे.
या शतकमहोत्सवी प्रयोगानिमित्त बोलताना दिलीप प्रभावळकर म्हणाले,"पत्रापत्री'चा शंभरीपर्यंतचा प्रवास हा आमचा नसून रसिकांचा आहे. दोन इरसाल मित्रांच्या पत्रांमधून रंगणारी ही टिंगलटवाळी, हा मिश्किल संवाद आणि या साभिनय अभिवाचनाची वेगळी शैली प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरली. या प्रयोगातील विनोद हा केवळ हसवण्यासाठी नाही, तर नात्यांमधला जिव्हाळा जपण्यासाठी आहे. म्हणूनच १०० प्रयोगांचा हा टप्पा आमच्यासाठी विशेष आहे. अजूनही या दोन मित्रांच्या गप्पा ऐकायच्या असतील, तर आम्ही तुमची वाट पाहत आहोत
‘पत्रापत्री’चा १०० वा प्रयोग हा केवळ एका यशस्वी कलाकृतीचा टप्पा नसून शब्दांवरच्या विश्वासाचा, मैत्रीच्या नात्याचा आणि संवादाच्या सामर्थ्याचा उत्सव आहे. शंभर प्रयोगांचा हा प्रवास पूर्ण करताना ‘पत्रापत्री’ने असंख्य रसिकांच्या मनात आठवणींची, भावनांची आणि माणुसकीची नवी पाने लिहिली आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा