महाश्वेतादेवींच्या कथांवर आधारित नाटक 'महोगाथा'.
प्रख्यात लेखिका महाश्वेतादेवी यांच्या सशक्त लेखणीतून उतरलेल्या तीन कथांवर आधारित असे 'महोगाथा' हे नवीन नाटक रंगभूमीवर आले आहे. सावित्री मेधातुल यांनी हे नाटक लिहिले असून, या नाटकाची निर्मिती सुद्धा त्यांनी केली आहे. मंगेश सातपुते यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. नाटकाचे नेपथ्य व वेशभूषा सुमित पाटील यांची आहे. विक्रम होता यांनी या नाटकाला संगीत दिले असून, विलास हुमणे यांनी प्रकाशयोजना केली आहे. हृदयनाथ जाधव, विक्रम होता, मुक्ती साधना आणि सावित्री मेधातुल हे चार कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १३ मार्च रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये सादर झाला. 'काली बिल्ली प्रॉडक्शन्स' या संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे.
आपल्या आजूबाजूला जे काही घडत आहे, त्याची एक नागरिक म्हणून जाणीव असणे आवश्यक आहे, असा विषय मांडणारे हे नाटक आहे. मनोरंजन व एक महत्त्वाचा विचार देणारे आणि सध्याच्या काळात सभोवती घडत असलेल्या विविध घटनांना प्रतिसाद, अशा स्वरूपाचे हे नाटक आहे. प्रेक्षकांना मनोरंजन तर हवेच असते; पण त्यासह विचारप्रवृत्त करायला लावणाऱ्या कलाकृतीचीही आवड त्यांना असते. त्याप्रकारचे हे नाटक आहे. या नाटकाचा फॉर्म थोडा वेगळा आहे. आपल्याकडे सांगितल्या जाणाऱ्या विविध गोष्टींचा फॉर्म या नाटकात वापरला आहे. हे नाटक रंगभूमीवर तर केले जाणारच आहे, पण त्या व्यतिरिक्तही उपलब्ध जागेत हे नाटक सादर करता येऊ शकते, अशी या नाटकाची रचना आहे.
नाटकाविषयीची मनोगते:-
मंगेश सातपुते (दिग्दर्शक):-
"मूळ कथेचे वाचन, मग त्यावर चर्चा, विचारमंथन, स्क्रिप्टिंग असे सर्व एकत्रित पद्धतीने चर्चा करून हे नाटक निर्माण झाले आहे. सध्याच्या काळात सभोवती जे काही घडत आहे, त्याची आपल्याला निदान जाणीव तरी असायला हवी. मग ते पर्यावरणाच्या बाबतीत असो, शिक्षणाच्या बाबतीत असो किंवा आपल्या जीवनाशी निगडित बाबींशी असो; आपल्याला एक नागरिक म्हणून त्याबद्दल माहिती असायला हवी आणि यावर हे नाटक भाष्य करते".
सावित्री मेधातुल (लेखिका, निर्माती):-
"सध्या आपल्याला ज्या विविध प्रकारच्या लढाया लढायला लागतात, त्याबद्दलची गोष्ट या नाटकात मांडण्यात आली आहे. मनोरंजनाच्या सोबत एक ठोस विचार मांडणारे हे नाटक आहे. हे नाटक करताना आम्ही त्याचा फॉर्म वेगळा ठेवला आहे. प्रत्यक्षात रंगभूमीच्या व्यतिरिक्त व्यासपीठावरही हे नाटक सादर करता येऊ शकते. खूप वेगवेगळे अनुभव असलेले आणि वेगवेगळे टॅलेंट असलेले चार कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत".
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा