'सामना' या चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि स्व.निळू फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'सामना' या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन…
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि सामना या चित्रपटास ५० वर्षे पूर्ण झाली या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त 'महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा'च्या 'दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा'तर्फे सामना' या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आणि चित्रपट निर्माते रामदास फुटाणे व दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्याशी संवाद आयोजित करण्यात आला आहे.
हा उपक्रम शनिवार दि.१८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथील तिसऱ्या मजल्यावरील लघुनाट्यगृहात होणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटात डॉ.श्रीराम लागू आणि निळू फुले यांची प्रमुख भूमिका असून रामदास फुटाणे यांनी निर्माता म्हणून तर डॉ. जब्बार पटेल यांचं दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे चित्रसृष्टीत पदार्पण केलं. चित्रपटाची कथा विजय तेंडुलकर यांनी लिहिली असून संगीत हे पंडित भास्कर चंदावरकर यांनी दिले आहे . तसेच या चित्रपटात मोहन आगाशे, विलास रकटे, स्मिता पाटील अशा मान्यवर कलाकारांनीही आपली व्यक्तिरेखा साकारली होती.
या चित्रपटास तीन राष्ट्रीय पुरस्कार (सर्वोत्कृष्ट मराठी फीचर फिल्मसह), सात महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कारांसह एकूण २५ हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
'चित्रपट रसास्वाद मंडळा'चे सदस्य तसेच मराठी चित्रपटप्रेमींनी या विशेष प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन 'महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा'ने केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा