ग्रॅमी पुरस्कार विजेते पद्मश्री श्री.शंकरजी महादेवन आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सन्मानित रीवा राठोड यांच्या सुमधुर स्वरांतून साकारलेलं भक्तिगीत प्रेक्षकांच्या भेटीला,

आषाढी वारीचे भक्तिमय वातावरण, विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि वारकऱ्यांच्या अढळ श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं ‘पालखी निघाली वारीला’ हे नवीन भक्तिगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नुकतेच या गाण्याचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. विठ्ठलनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि वारकऱ्यांच्या अखंड भक्तीभावात रंगलेलं हे गाणं प्रत्येकाला वारीचा आध्यात्मिक अनुभव देत आहे.    या गाण्याला सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि मधुर आवाजाची गायिका रीवा राठोड यांनी आपल्या सुरांनी समृद्ध केलं आहे. ज्येष्ठ गायक-संगीतकार रूप कुमार राठोड आणि गायिका सुनाली राठोड यांची कन्या असलेल्या रीवाने या गीताच्या माध्यमातून प्रथमच मराठीत गायन केलं असून, तिच्या सुरेल आवाजाने या भक्तिगीताला एक वेगळीच भावस्पर्शी उंची मिळाली आहे. ज्येष्ठ संगीतकार रूप कुमार राठोड यांनी या गाण्याला संगीत दिलं असून, डॉ. दीपक वझे यांनी विठ्ठलभक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचं सार शब्दांत प्रभावीपणे मांडलं आहे.या गाण्याची सुंदर ध्वनिचित्रफित सौ.श्वेता परुळकर यांनी केली आहे.हे गाणे डीएफएफने प्रस्तुत केले आहे.
    आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रदर्शित झालेलं हे गाणं वारकरी संप्रदायाच्या भक्तीची, एकतेची आणि परंपरेची अनुभूती देणार आहे. ‘विठ्ठल… विठ्ठल…’ या नामघोषासह पालखी सोहळ्याचं भव्य दर्शन घडवणारं हे गाणं प्रत्येक भक्ताच्या मनात भक्तीचा दीप प्रज्वलित करेल.
   या गाण्याबद्दल गायक शंकर महादेवन म्हणतात,”‘पालखी निघाली वारीला’ हे गातांना मला प्रत्यक्ष वारीचा अनुभव घेत असल्यासारखं वाटलं. विठ्ठलभक्ती, वारकऱ्यांचा उत्साह आणि त्या वातावरणातील सात्त्विक ऊर्जा या गाण्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.”
     गायिका रीवा राठोड म्हणतात, “वारी ही भावनांची आणि श्रद्धेची अखंड यात्रा आहे. अशा पवित्र भावनेवर आधारित गाण्याचा भाग होता आलं, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. प्रेक्षकांना हे गाणं ऐकताना विठ्ठलनामात तल्लीन झाल्याचा अनुभव नक्कीच मिळेल.”

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.