भयाच्या सावटात झाला ‘भूतम भयम्’चा ट्रेलर लॉन्च.

चित्रपटाच्या घोषणेपासूनच चर्चेत असलेल्या ‘भूतम भयम्’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून एक भव्य, आगळ्यावेगळ्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या वातावरणात हा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच संपन्न झाला. चित्रपटाच्या विश्वाची अनुभूती देणाऱ्या खास हॉरर-थीम सेटवर पार पडलेल्या या भव्य ट्रेलर लॉन्च सोहळ्यात उपस्थितांना ‘भूतम भयम्’च्या रहस्यमय दुनियेचीच सफर घडली. 
या ट्रेलर लाँच सोहळ्याचं आणखी एक खास आकर्षण म्हणजे ‘ऑरेंज ज्यूस गँग’च्या पालकांची उपस्थिती. या विशेष प्रसंगी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्या संघर्षमय प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर म्हणून सुरुवात करून आज मोठ्या पडद्यावर झळकण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास ऐकताना वातावरण भावूक झालं. सुरुवातीला कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रात जाण्याबाबत साशंक असलेल्या पालकांनीही आज त्याच मुलांना रुपेरी पडद्यावर पाहून अभिमानाने डोळे भरून आल्याचं सांगितलं. मुलांच्या मेहनतीचं, चिकाटीचं आणि यशाचं कौतुक करताना अनेक पालकांना आनंदाश्रू अनावर झाले. या भावनिक क्षणांनी ‘भूतम भयम्’च्या ट्रेलर लाँच सोहळ्यात एक वेगळीच रंगत आणली. सोशल मीडियावर या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत असून ट्रेलरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. ट्रेलरमध्ये सात बेरोजगार मित्रांच्या आयुष्यात अचानक आलेल्या एका रहस्यमय ‘परीसा’ची गोष्ट उलगडताना दिसते. पैशांची चणचण आणि आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची धडपड सुरू असतानाच त्यांच्या हाती क्षणार्धात नशीब बदलून टाकण्याची ताकद असलेला एक गूढ परीस लागतो. हा परीस त्यांच्या सर्व समस्यांचं उत्तर ठरणार असं वाटत असतानाच गोष्ट अनपेक्षित वळण घेते. कारण या परिसाच्या शोधात ते एकटे नसल्याचे समजते. त्यानंतर सुरू होणारी जीवघेणी शर्यत, अजब घटना, रहस्याचा वाढत जाणारा गुंता आणि सात मित्रांची धमाल फजिती ट्रेलरमध्ये वेगळीच रंगत आणते. हा परीस त्यांच्या आयुष्याला सोन्याचा स्पर्श देणार की त्यांना नव्या संकटांच्या गर्तेत ढकलणार, याचं उत्तर मात्र चित्रपटगृहातच मिळणार आहे.
     चित्रपटाचं आणखी एक मोठं आकर्षण म्हणजे सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, नील साळेकर आणि करण सोनावणे हे पाच कंटेंट क्रिएटर्स पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकत आहेत. तर त्यांना पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम यांची जबरदस्त साथ लाभली आहे. या सगळ्या कलाकारांच्या सहज अभिनयाची, भन्नाट कॉमिक टायमिंगची आणि एकमेकांमधील अफलातून केमिस्ट्रीची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे डिजिटल विश्व गाजवणाऱ्या या चेहऱ्यांना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
   याविषयी दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर म्हणाले, “‘भूतम भयम्’ ही सात मित्रांच्या नशिबाभोवती फिरणारी एक भन्नाट सफर आहे. ट्रेलरमधून आम्ही त्या जगाची केवळ एक झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे. रहस्य, विनोद आणि सतत घडणाऱ्या अनपेक्षित घटना प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवतील. मोठ्या पडद्यावर हा अनुभव आणखी रोमांचक आणि मनोरंजक ठरणार आहे.”निर्माते नरेन कुमार म्हणाले, “या चित्रपटाची कल्पना ऐकताच त्यात काहीतरी वेगळेपण असल्याची जाणीव झाली होती. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या या कलाकारांना एका अनोख्या कथानकात एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. ट्रेलरला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रेक्षक या नव्या प्रयोगालाही भरभरून प्रतिसाद देतील, अशी आम्हाला खात्री आहे.”
    निर्माते महेश ज्ञानदेव कोरडे म्हणाले, “आजचा मराठी प्रेक्षक आशयासोबतच वेगळ्या सादरीकरणाचीही अपेक्षा ठेवतो. ‘भूतम भयम्’मध्ये मनोरंजन, तांत्रिक गुणवत्ता आणि वेगळा विषय यांचा उत्तम मेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
    झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले, “‘भूतम भयम्’च्या ट्रेलरमधून चित्रपटाच्या वेगळ्या विश्वाची झलक प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. हॉरर-कॉमेडी हा प्रेक्षकांचा आवडता जॉनर असून, त्यात या नव्या कलाकारांची ऊर्जा आणि रहस्यपूर्ण कथानकाची जोड मिळाल्यामुळे हा चित्रपट एक वेगळाच मनोरंजनाचा अनुभव देणार आहे.”
रहस्य, थरार, हॉरर, भन्नाट विनोद, रहस्यमय ‘परीस’ आणि सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहऱ्यांची मोठ्या पडद्यावरील धमाकेदार एन्ट्री… या सगळ्यामुळे ‘भूतम भयम्’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भन्नाट हॉरर-कॉमेडी अनुभव ठरणार, हे ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे.
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रामचंद्र अरुण गांवकर यांनी केलं आहे. नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे हे चित्रपटाचे निर्माते असून, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.