दानशूर आदरणीय भागोजी शेठ कीर स्मारक लोकार्पण ...

    आज नररत्नांच्या आमच्या रत्नागिरी शहराच्या वेशीवर साळवी स्टॉपच्या परिसरात दानशूर आदरणीय श्रीमंत भागोजी शेठ कीर यांच्या पवित्र स्मारकाचा लोकार्पण समारंभ सायंकाळी संपन्न होत आहे. राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री यांच्या पुढाकारातून आणि त्यांच्या सामाजिक वरदहस्त दूरदृष्टीतून हे स्मारक उभे राहत आहे ही घटना इतिहासातील सुवर्णपान आहे. म्हणूनच मा. उदयजी सामंत आपले हार्दिक अभिनंदन! रत्नागिरी शहराच्या प्रारंभ वेशीवर काही वर्षांपूर्वी ‘स्वर्गीय भागोजीशेठ कीर प्रवेशद्वार’ ही सर्वांचे लक्ष वेधून घेणारी कमानसुद्धा पालकमंत्र्यांच्याच समाजदखल दृष्टीकोनातून उभी राहिली. या पवित्र स्मारकातून रत्नागिरी आणि महाराष्ट्रातल्या भविष्यातील पिढ्या नवा संदेश, नवी प्रेरणा घेतील. यातूनच परस्परांतील सामाजिक मैत्री आणि ऋणानुबंध वाढीला लागतील, अशी आपण खात्री बाळगूया. राष्ट्रपुरुषांच्या समाज शिल्पकारांच्या स्मारकांचा अभिमान बाळगताना त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा चालवण्याची जबाबदारी ही तुम्हा-आम्हा सर्वांची आहे. दानशूर भागोजीशेठ कीर यांचे कार्य हे केवळ भंडारी ज्ञातीपुरतं मर्यादित नाही. हे त्यांच्या जीवनचरित्रावर एक नजर फिरवली तर लक्षात येईल. रत्नागिरीच्या पेठकिल्ला भागातील या सुपुत्राने आपल्या कार्यकर्तृत्वावर रत्नागिरी ते मुंबई ही केलेली जीवन वाटचाल, या वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यावर केलेले अभूतपूर्व कार्य आणि काम हा समाजसेवेचा वसा आहे. दान असणं आणि ते देण्याची दानत असणं हा व्यक्तिगत जीवनातील कपिलाषष्ठी योग असतो. त्या योगाचे मूर्तीमंत व्यक्तिमत्व रूप म्हणजे आदरणीय भागोजीशेठ कीर. मुंबईपासून काशी, वाराणसीपर्यंत आणि पंढरपूरपासून गाणगापूरपर्यंत अनेक धर्मशाळा, अनेक भक्तिसंस्था या महापुरुषानं उभ्या केल्या. देशाची, जगाची आर्थिक राजधानी असणार्‍या मुंबई शहरात त्यांनी अनेक ऐतिहासिक वास्तू साकारल्या. बांधल्या. रत्नागिरीतील ऐतिहासिक पतितपावन मंदिराची उभारणी याच महापुरुषाने केली. पुढे याच पतितपावन मंदिरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या भारतमातेच्या महान सुपुत्राने स्वर्गीय भागोजीशेठ कीर यांच्या उदार समाजसेवा प्रेरणेतून बहुजन समाजबांधवांना सन्मानपूर्वक निमंत्रित करून सामूहिक भोजन पंगतीचा आनंद दिला. समाजबांधवांनो इतिहासाचे पुस्तक आवडलं नाही तर बाजूला ठेवता येतं, प्रसंगी काहीजण ते फाडतात, प्रसंगी काहीजण ते जाळतात; पण या कृती आणि कृत्यांनी इतिहास आणि इतिहासाच्या नोंदी बदलत नाहीत. इतिहास इतिहास असतो. स्वर्गीय दानशूर भागोजीशेठ कीरांनी केलेलं अजरामर काम हा भारताच्या सामाजिक परिवर्तनातील विधायक इतिहास आहे. नररत्नांच्या रत्नागिरीतील लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, दानशूर श्रीमंत भागोजीशेठ कीर, थोर चरित्रकार धनंजय कीर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी एस. एम. जोशी या आणि इतर अनेक राष्ट्रपुरुषांनी आपल्या कामाने समाजक्रांतीचे थोर कार्य केलं याची जाणीव आपण सर्वांनी ठेवायला हवी.
प्रिय उदयजी सामंत आपल्या कल्पक दृष्टीकोनातून आणि व्यापक दूरदृष्टीतून रत्नागिरी शहरात शिवसृष्टीपासून तारांगणांपर्यंत आणि आरे-वारेतील संभाव्य प्रस्तावित प्राणी संग्रहालयापासून रत्नागिरी विमानतळाचे पुनर्विकासापर्यंत उभी राहणारी विकास कामांची शृंखला ही रत्नागिरी शहर आणि परिसराच्या प्रगतीची नांदी आहे. म्हणूनच प्रिय उदयजी आपलं मनापासून हार्दिक अभिनंदन!* आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आज आपल्या शुभहस्ते दानशूर भागोजीशेठ कीर स्मारकाचं लोकार्पण होत आहे. त्याचवेळी या राष्ट्रपुरुषांचे विधायक विचार आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे आणि त्यातून खर्‍या अर्थाने समाजाची प्रगती करणे ही आम्हा सर्वांची प्रत्येकाची राष्ट्रीय जबाबदारी आहे याचं भान आपण सर्वांनीच ठेवायला हवं. आजच्या या स्मरणीयदिनी माझी एक विधायक सूचना आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. रत्नागिरी शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असणार्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या अनेक मान्यवरांच्या स्मृतींचा जागर करणारं रत्नागिरी शहरात एक भव्य-दिव्य ‘रत्नागिरी भवन’ आपल्या कल्पकतेतून उभं रहावं. या भवनात रत्नागिरीच्या, राज्याच्या आणि देशाच्या सामाजिक जीवनात उत्तुंग कार्य केलेल्या नामवंत व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाचा आणि जीवन वाटचालीचा आलेख यांचं दर्शन विविध दालनातून व्हायला हवं. या रत्नागिरी भवन वास्तुत नव्या पिढीसाठी भव्य दिव्य अभ्यासिका असावी, येथे स्पर्धा परीक्षातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, इथे कौशल्य विकासाचे युवकांना धडे मिळावेत, नवनिर्मितीचा ध्यास असणार्या युवक-युवतींना या भवनात विविध विषयांवर संशोधन करण्याची संधी मिळावी, विविध कला शाखांचे अभ्यास वर्ग इथं भरावेत आणि विविध कलांचं सादरीकरण या भवनात सादर केलं जावं. आपल्या रत्नागिरीत भविष्यात असं ऐतिहासिक ‘रत्नागिरी भवन’ समस्त रत्नागिरीकरांच्या सदिच्छेतून, पाठबळातून आणि आपल्या कल्पक पुढाकारातून उभं रहावं अशी सदिच्छा एक रत्नागिरीकर म्हणून आजच्या स्मारक लोकार्पणाच्या निमित्ताने व्यक्त करीत आहे. मला खात्री आहे भविष्यात आपल्या पुढाकारानं समस्त रत्नागिरीकरांना एक आदर्श ‘रत्नागिरी भवन’ ही वास्तू संस्था पहायला मिळेल. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...