नात्यांच्या हळव्या भावविश्वाला स्पर्श करणारे ‘माया’ चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला.
नात्यांच्या सूक्ष्म छटा आणि अंतर्मनातील भावविश्व हळुवारपणे उलगडणाऱ्या आगामी ‘माया’ या चित्रपटाचे बहुप्रतीक्षित शीर्षक गीत आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मनाच्या गाठी, आठवणींची ओल आणि जिव्हाळ्याच्या नात्यांमधून उमटणारी भावनिक ऊब या सगळ्यांना स्पर्श करणारा हा अनुभव चित्रपटाच्या आशयाला सुरेल आणि अर्थपूर्ण रूप देताना दिसतो.गाण्याची धून शांत, हळवी आणि मनात रेंगाळणारी आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत गाण्याची भावछटा प्रेक्षकांना एका अंतर्मुख प्रवासावर घेऊन जाते. जिथे आठवणी, नात्यांची ऊब आणि भावनिक स्वीकार यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. या शीर्षक गीताला गायक पार्थ उमराणी यांनी भावपूर्ण आवाज दिला असून, या गाण्याला संगीत ही त्यांनीच दिले आहे. साधेपणातून व्यक्त होणारी संवेदनशीलता ही या गाण्याची खासियत ठरते. वैभव जोशी यांच्या शब्दांमधून माणसाला माणसाशी जोडून ठेवणारी माया अत्यंत सुंदर पद्धतीने व्यक्त होते.
दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, “ चित्रपटाचा आशय ज्या भावविश्वाभोवती फिरतो, त्याची पहिली अनुभूती प्रेक्षकांना शीर्षक गीतातून मिळावी, अशी आमची इच्छा होती. ‘माया’ या शब्दात असलेली ऊब, नात्यांमधील जिव्हाळा आणि मनातील गुंतागुंत हे सगळे संगीत आणि शब्दांमधून प्रामाणिकपणे व्यक्त करण्यात आले आहे.”
निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणतात, “ कथेला भावनिकता देणारं आणि प्रेक्षकांना लगेच जोडून घेणारं असं शीर्षक गीत असणं आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. पार्थ उमराणी आणि वैभव जोशी यांनी गाण्याला दिलेली संवेदनशील हाताळणी चित्रपटाच्या भावविश्वाला अधिक समृद्ध करते.”
शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘माया’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, मुक्ता बर्वे, गिरीश ओक, विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या व्यक्तिरेखा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उभ्या असलेल्या माणसांच्या भावविश्वाचे प्रभावी प्रतिनिधित्व करतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा