‘समर्थ’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित.
समर्थ विचारांनी अनेक पिढ्यांना जीवन जगण्याची प्रेरणा दिली. त्याच विचारांचा आधुनिक संदर्भात अर्थ उलगडणारा आगामी मराठी चित्रपट ‘समर्थ’ आता आणखी एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. चित्रपटाचा दमदार आणि भावस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित झाला असून टीझरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता आता आणखी वाढली आहे. नात्यांतील ताण, दोन पिढ्यांतील विचारांचा संघर्ष आणि समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीतून आयुष्याला मिळणारी नवी दिशा यांचा प्रभावी संगम या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो.
ट्रेलरमधून ही कथा एका सामान्य कुटुंबाची असल्याचे दिसतेय. आयुष्याच्या एका टप्प्यावर अध्यात्माचा स्वीकार करणारे वडील आणि त्यांच्या विचारांना विरोध करणारा मुलगा यांच्यातील संघर्ष अधिक यात ठळकपणे समोर येतो. बदलत्या काळात नात्यांमधील संवाद कसा हरवत चालला आहे, कुटुंबात निर्माण होणारा दुरावा किती खोलवर जातो आणि अशा वेळी समर्थ रामदास स्वामींची शिकवण माणसाला स्वतःकडे नव्याने पाहाण्याची ताकद कशी देते, याची भावनिक आणि प्रेरणादायी झलक ट्रेलरमध्ये अनुभवायला मिळते.
केवळ अध्यात्माची मांडणी न करता, आधुनिक जीवनातील वास्तव, भावनिक संघर्ष, नात्यांचे बदलते स्वरूप आणि जीवनमूल्यांचे महत्त्व यांचा समतोल साधणारी कथा ट्रेलरमधून प्रभावीपणे उलगडते. प्रत्येक प्रसंगातून प्रेक्षकांना स्वतःच्या आयुष्याशी नाते जोडता येईल, अशी आशयघन मांडणी या ट्रेलरमध्ये दिसून येते.
निर्माते रविंद्र पाठक म्हणाले, ”‘समर्थ’ हा चित्रपट म्हणजे दोन पिढ्यांमधील संवाद पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात हरवत चाललेली नाती, संस्कार आणि जीवनमूल्ये यांची नव्याने जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे. ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असून, चित्रपटही प्रेक्षकांच्या मनात तितकाच खोलवर पोहोचेल, अशी आम्हाला खात्री आहे.”
या चित्रपटात भूषण प्रधान, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी जमेनिस, हार्दिक जोशी, ईशा केसकर, प्रसाद खांडेकर, राजन भिसे, यतिन कार्येकर, दिशा परदेशी आणि निखिल राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित ‘समर्थ’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट १४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक जीवनाशी जोडलेला प्रेरणादायी प्रवास, भावनिक नात्यांची गुंफण आणि अंतर्मुख करणारा आशय यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा