लहानग्यांच्या निरागस आवाजात पहिल्यांदाच ‘श्री स्वामी समर्थ तारक मंत्र’.

राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र हिने सुरू केलेल्या ‘सावनी रेकॉर्डझ’ या म्युझिक लेबलची दुसरी कलाकृती आता स्वामीभक्तांच्या भेटीला आली आहे. ‘मुजरा शिवबाला’ या पहिल्याच सादरीकरणाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता ‘श्री स्वामी समर्थ तारक मंत्र’ या आगळ्यावेगळ्या कलाकृतीचे प्रकाशन करण्यात आले असून, या मंत्राची सर्वात मोठी खासियत म्हणजे पहिल्यांदाच लहान मुलींच्या निरागस आवाजातून हा प्रभावी तारक मंत्र सादर करण्यात आला आहे.
   आजवर ‘श्री स्वामी समर्थ तारक मंत्रा’च्या अनेक आवृत्त्या रसिकांसमोर आल्या. मात्र त्या सर्व प्रौढ गायकांच्या आवाजात होत्या. पुढील पिढीपर्यंत अध्यात्म, संस्कार आणि भक्ती सहजपणे पोहोचावी, या उद्देशाने सावनी रवींद्रने या मंत्राला बालस्वरांचे रूप दिले आहे. त्यामुळे हा मंत्र  भक्तीचा अनुभव देतानाच मुलांच्या मनात संस्कारांची बीजही सहज रुजवतो.या अनोख्या संकल्पनेविषयी सावनी रवींद्र म्हणते, “आजवर तारक मंत्राची अनेक व्हर्जन्स युट्युबवर आली आहेत आणि ती सगळी मोठ्यांनी गायली आहेत. पण पुढच्या पिढीवर संस्कार होणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि हा आवाज त्याच वयाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचला तर तो त्यांना अधिक जवळचा वाटतो. मोठ्यांनी म्हटलेले मंत्र मुलांना ऐकवण्यापेक्षा त्यांच्या वयोगटाच्या आवाजातील मंत्र त्यांनी ऐकले तर ते त्यांना पटकन रिलेट होतात आणि सहज त्यांच्या ओठी रुळतात. हीच कल्पना मनात आली आणि या मंत्राची निर्मिती करण्याचं ठरवलं. अनेक घरांमध्ये मुलांना झोपताना मंत्र ऐकवले जातात, दिवसाची सुरुवात मंत्राने केली जाते. अशा वेळी हा ट्रॅक पालकांसाठी आणि पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी हा मंत्र नक्कीच उपयुक्त ठरेल, असा माझा विश्वास आहे.”
या गीताचे बोल विश्वनाथ दामोदर वऱ्हाडपांडे यांनी लिहिले असून संगीत प्रणव हरिदास यांचे आहे. या मंत्राला रीत नारंग, हृदया दातार आणि सावनी रवींद्र यांनी स्वरबद्ध केले आहे. एव्हरटेल स्टुडिओजची संकल्पना आणि संयोजन लाभलेल्या या कलाकृतीचे दिग्दर्शन गोपी नायर यांनी केले आहे. तर डॅा आशिष धांडे आणि सावनी रवींद्र यांच्या सा प्रोडक्शन्सची निर्मिती आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.