'मराठी वारसा'च्या नव्या लोगोमध्ये प्रेक्षकांचा थेट सहभाग.
अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी ऐतिहासिक मालिका 'सावित्रीबाई जोतीराव फुले' सध्या 'मराठी वारसा' या लोकप्रिय यूट्यूब वाहिनीवर प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. मालिकेला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रेक्षकांच्या मागणीनुसार आता १७ ऑगस्ट ते २२ ऑगस्टदरम्यान, सोमवार ते शनिवार, मालिकेचे नवे भाग सलग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर 'मराठी वारसा'ने आपल्या डिजिटल प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा जाहीर केला आहे. वाहिनीची नवी ओळख आणि नवा लोगो साकारताना प्रेक्षकांनाही या प्रक्रियेत थेट सहभागी करून घेण्यात येणार आहे.
'मराठी वारसा'च्या नव्या लोगोची संकल्पना प्रेक्षकांनी आपल्या कल्पकतेतून आणि सर्जनशीलतेतून साकारावी, यासाठी विशेष लोगो डिझाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 'मराठी वारसा'च्या विचारधारेचे, मराठी संस्कृतीचे आणि या वाहिनीशी जोडलेल्या भावनेचे प्रतिनिधित्व करणारा नावीन्यपूर्ण लोगो तयार करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या कल्पनेतून तयार केलेली लोगोची प्रवेशिका १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पाठवता येणार आहे. प्राप्त प्रवेशिकांमधून उत्कृष्ट आणि सर्जनशील लोगोची निवड केली जाणार असून, पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. AI-निर्मित लोगो स्वीकारला जाणार नाही. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपली लोगो प्रवेशिका ऑनलाइन पद्धतीने सादर करावी. प्रवेशिका सादर करण्यासाठी या https://marathiwarasa.com/logo-competition/ संकेतस्थळाला भेट द्यावी स्पर्धेचे नियम, अटी, प्रवेशिका सादर करण्याची प्रक्रिया तसेच इतर आवश्यक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.या स्पर्धेचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे विजेत्यांना 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेच्या सेटवर भेट देऊन मालिकेतील कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची विशेष संधी मिळणार आहे. त्यामुळे केवळ लोगो डिझाइन करण्याचीच नव्हे, तर आपल्या आवडत्या मालिकेच्या निर्मिती प्रक्रियेचा जवळून अनुभव घेण्याची संधीही प्रेक्षकांना मिळणार आहे. या अनोख्या उपक्रमाची माहिती देणारा विशेष व्हिडिओ अभिनेते अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मीडिया माध्यमांवर शेअर केला आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हा उपक्रम शक्य झाल्याचे सांगत त्यांनी या अभिनव संकल्पनेबद्दल आनंद व्यक्त केला.
याविषयी अमोल कोल्हे म्हणाले, "एखादी मालिका यशस्वी ठरते ती केवळ कलाकार किंवा तंत्रज्ञांमुळे नाही, तर प्रेक्षकांच्या विश्वासामुळे. 'सावित्रीबाई जोतीराव फुले'ला मिळालेलं प्रेम हे आमच्यासाठी मोठं बळ आहे. म्हणूनच या प्रवासात प्रेक्षकांनाही सहभागी करून घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या भावना आणि त्यांचा आवाजच 'मराठी वारसा'च्या नव्या ओळखीचा भाग होणार आहे. हा फक्त लोगो बदल नाही, तर प्रेक्षकांशी असलेलं नातं अधिक दृढ करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे."
डिजिटल माध्यमांमध्ये प्रेक्षकांना केवळ आशयाचे ग्राहक न मानता, ब्रँडच्या ओळखीच्या निर्मितीत त्यांचा थेट सहभाग करून घेण्याचा हा प्रयोग निश्चितच वेगळा आणि अभिनव ठरणार आहे. 'मराठी वारसा'च्या नव्या लोगोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या कल्पना आणि वाहिनीची नवी ओळख यांचा सुंदर संगम घडणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा