महाराष्ट्रातील अपरिचित रंजक कथा घेऊन लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे रेडिओ मिर्चीत.
महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास आणि त्यामागील रंजक, अपरिचित कथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने रेडिओ मिर्चीच्या वतीने ‘असा घडला महाराष्ट्र’ या नव्या रेडिओ कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्या आवाजातून आणि निवेदनातून महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक माहिती नसलेल्या पैलूंवर या कार्यक्रमातून प्रकाश टाकला जाणार आहे. या शोचा शुभारंभ येत्या २४ ऑगस्ट पासून होणार असून शुभारंभाची वेळ सायंकाळी ६ ते ८ असून यानंतर दररोज हा शो सकाळी ८ ते १० आणि संध्याकाळी ६ ते ८ वाजता प्रसारित होणार आहे.
सुबोध भावेंसोबतचा रेडिओ मिर्चीचा हा स्पेशल रेडिओ शो नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती, संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या प्रमुख शहरामध्ये रसिक प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार ऐकता येणार आहे. तसेच शनिवार आणि रविवारच्या स्वतंत्र वेळा या शोदरम्यान लवकरच जाहीर करण्यात येतील असे म्हटले आहे.विधी महाविद्यालय रस्त्यावरील लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या कार्यालयात बुधवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुबोध भावे बोलत होते. कार्यक्रमास लोकमान्य मल्टिपर्पजचे विभागीय प्रमुख सुशील जाधव, रेडिओ मिर्चीचे व्यवसाय प्रमुख जयेश पाटील, प्रादेशिक प्रमुख पुनीत केळकर, आरजे विभागाच्या प्रमुख स्मिता रणदिवे, राहुल गजबार आदी उपस्थित होते. लोकमान्य मल्टिपर्पज, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे.
या प्रसंगी बोलताना अभिनेते सुबोध भावे म्हणाले, “आपल्या कुटुंबातील व्यक्ती एकत्र आल्यावर पूर्वीच्या गोष्टी सांगितल्या जातात. त्या गोष्टींमधून ऊर्जा मिळते आणि नव्याने काम करण्याची प्रेरणा मिळते. महाराष्ट्र हा आपला मोठा परिवार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या जडणघडणीशी संबंधित अनेक अपरिचित आणि रंजक गोष्टी समोर येतील. मातीशी असलेली आपली नाळ पुन्हा जोडण्याचा हा प्रयत्न आहे. माझा महाराष्ट्र लोकांपर्यंत पोहोचवणे हा माझा स्वार्थ आहे.”
रेडिओवरील निवेदकाचे काम आव्हानात्मक असल्याचे सांगत भावे म्हणाले, “चेहरा न दाखवता केवळ आवाजातून श्रोत्यांना जोडून ठेवणे सोपे नाही. आरजे यांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत. ‘असा घडला महाराष्ट्र’साठी रेडिओ मिर्चीच्या टीमने मोठा अभ्यास करून विश्वसनीय माहिती संकलित केली आहे.”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा संदर्भ देत भावे म्हणाले की, महाराजांच्या कर्तृत्वात जात-पात न पाहता सर्वांना सोबत घेऊन जाण्याची शिकवण आहे. शिवजयंतीला केवळ गाणी लावणे किंवा झेंडा घेऊन फिरण्यापेक्षा त्यांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. नकारात्मक वातावरणात सकारात्मक विचार पोहोचवून समाजाला मातीशी आणि इतिहासाशी जोडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे. आपला जाज्वल्य इतिहास आणि पराक्रम याचा अभिमान आपण बाळगला पाहिजे आणि मराठी भाषा बोलण्याचा आग्रह आपणच धरला पाहिजे त्याची लाज कधी बाळगली नाही पाहिजे.
जयेश पाटील म्हणाले, “सातत्याने नकारात्मक बातम्या समोर येत असताना चांगल्या गोष्टी कोण सांगणार, हा प्रश्न होता. त्यामुळे सुबोध भावे यांच्याशी चर्चा करून हा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रमाची संहिता मोठ्या अभ्यासातून आणि मेहनतीने तयार करण्यात आली आहे.”
सुशील जाधव यांनी लोकमान्य मल्टिपर्पजच्या वाटचालीची माहिती देताना सांगितले की, संस्था १९९५ पासून कार्यरत असून पुण्यातील कामकाजाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. संस्थेच्या २१३ शाखा असून सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यापैकी सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या ठेवी पुणेकरांच्या आहेत. संस्थेचे प्रमुख किरण ठाकूर यांनी बेळगावमध्ये ‘तरुण भारत’ची सुरुवात करून बेळगाव महाराष्ट्रात यावे यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. बेळगावच्या इतिहासाशी संबंधित विविध बाबींचाही या कार्यक्रमातून ऊहापोह केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे निमी यांनी तर आभार प्रदर्शन आरजे विभागाच्या प्रमुख स्मिता रणदिवे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा