नाट्य परिषदेचे यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल सुरू होणार.... १४ जूनला कार्यक्रम.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. नवनिर्वाचित नियामक मंडळ व कार्यकारी समितीने पदभार स्विकारल्यानंतर पहिल्याच संपन्न झालेल्या दोन्ही सभांमध्ये अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेले नाट्यसंकुल पुन्हा चालू व्हावे अशी मागणी अनेक सभासदांची व रसिकांची होती. यास परिषदेचे तहहयात विश्वस्त श्री. शरद पवार, विश्वस्त उदय सामंत, शशी प्रभू यांनी संमती दिली आणि नवनिर्वाचित नियामक मंडळाने संकुल दुरूस्त करून रसिकांसाठी व नाट्य कलावंतांसाठी खुले करावे असा ठराव केला व नाट्य संकुलाच्या दुरुस्तीचे कामकाज जोमाने सुरू झाले आणि येत्या दि. १४ जूनला नाट्यसंकुल सुरू होईल यासाठी युध्दपातळीवर दुरूस्तीचे कामकाज सुरू आहे. अशी माहिती अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली.या दुरूस्तीच्या कामकाजासाठी विशेष परिश्रम घेतले जात आहेत. नाट्य परिषदेचे पदाधिकारी, सदस्य उभे राहून कामकाज करून घेत आहेत.यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल पूर्वीप्रमाणे सुरू होऊन येथे नाटक, संगीत कार्यक्रम, सभा व सांस्कृतिक उपक्रमांसाठी १ जुलै पासून रसिकांच्या सेवेत रुजू होईल अशी माहिती प्रमुख कार्यवाह श्री. अजीत भुरे यांनी दिली.नाट्य संकुलात नाट्यगृह, नाटकाच्या तालमीसाठी अद्ययावत तालीम हॉल, छोट्या कार्यक्रमांसाठी मंच, लायब्ररी,नाट्य कला अकादमी, कलावंतांसाठी निवास व्यवस्था व नाट्यअनुषंगिक सर्व घटकांसाठी नाट्यपरिषद पुढील काळात वाटचाल करणार आहे.१४ जून गोविंद बल्लाळ स्मृतीदिन व पारितोषिक वितरण सोहळा नाट्य परिषद दरवर्षी आयोजित करत असते.परंतु मागील चार वर्षात कोणतेही कार्यक्रम झालेले नाहीत. यंदाच्या वर्षी १४ जूनचा कार्यक्रम नुतनीकरण केलेल्या नाट्य संकुलात दिमाखात साजरा होणार असून यंदाचा जीवनगौरव पुरस्कार नाट्य ज्येष्ठ अभिनेते श्री. मोहन जोशी व जेष्ठ अभिनेत्री श्रीमती वंदना गुप्ते यांना जाहीर करण्यात आला आहे.श्री. मोहन जोशी हे रंगभूमीवर गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ काम करीत आहेत. अनेक नाटकांमधून आजपर्यंत
सक्रीयपणे ते भूमिका करत आहेत. हिंदी, मराठी, भोजपुरी व अनेक भाषेतून त्यांनी ४५० पेक्षाही अधिक चित्रपटांतून भूमिका केली आहे. भारत सरकारचा नाट्य कला अकादमी पुरस्कार जोशी यांना मिळाला आहे. मोहन जोशी यांनी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून १३ वर्ष काम पाहिले आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल मोहन जोशी यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सुरू झाले. नाट्य परिषदेचे कार्य महाराष्ट्रभर पोहचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती वंदना गुप्ते यांनी रंगभूमीवर अनेक वर्षांपासून मराठी, हिंदी भाषेतून नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. तसेच अ.भा.म.नाट्यपरिषदेच्या २००४ ते २०१३ ह्या काळात कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली होती.१०० वे नाट्य संमेलनाच्या बाबत लवकरच नियोजन आखण्यात येणार आहे. हे संमेलन नाट्य कलावंत व नाट्यरसिकांसाठी वेगळी पर्वणी ठरणार आहे.
Comments
Post a Comment