‘अलबत्या गलबत्या’ची १००० प्रयोगांकडे वाटचाल; २८ सप्टेंबरला गीतांचे अनावरण.

अद्वैत थिएटर निर्मित आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी लिखित ‘अलबत्या गलबत्या’ हे विश्वविक्रमी बालनाट्य १००० प्रयोगांच्या दिशेने वाटचाल करत आहे. सुमारे ५० वर्षांपूर्वी रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीतून जन्माला आलेल्या या नाटकाने आजवर बालप्रेक्षकांसह मोठ्यांनाही भुरळ घातली आहे.या नाटकाने ३६५ दिवसांत ३३३ प्रयोग हाऊसफुल्ल करण्याचा विक्रम केला आहे. तसेच एका दिवसात चार, पाच आणि एकाच टीमने सहा प्रयोग सादर करण्याची नोंदही या नाटकाच्या प्रवासात झाली आहे. मराठी रंगभूमीच्या इतिहासातील हा विशेष टप्पा मानला जात आहे.
‘अलबत्या गलबत्या’च्या माध्यमातून बालप्रेक्षकांच्या मनोरंजनासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला आणि मराठी भाषेच्या संस्कारांना हातभार लागतो. नाटकातील गाणीही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत.
चिन्मय मांडलेकर, रत्नाकर मतकरी, समृद्धी पांडे, संचित गायकवाड आणि संस्कारी यांनी लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते, वैशाली सामंत तसेच बालकलाकारांनी आवाज दिला आहे. ही गाणी आता बालप्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहेत.या गीतांचे संगीत अनावरण सोमवार, २८ सप्टेंबर रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे सकाळी ८ ते १०.३० या वेळेत होणाऱ्या प्रयोगानंतर करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे प्रशासक मा. श्री. विद्याधर अनास्कर आणि बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. नीलम शिर्के उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते गीतांचे अनावरण होणार आहे.
१००० प्रयोगांच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ‘अलबत्या गलबत्या’च्या या प्रवासात गीतांच्या अनावरणामुळे आणखी एक महत्त्वाचा टप्पा नोंदवला जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...