‘चित्रनगरीच्या राजा’ची प्राणप्रतिष्ठा उत्साहात संपन्न.

 महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘चित्रनगरीच्या राजा’ गणेशोत्सवाची आज, सोमवार दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेने उत्साहात सुरुवात झाली. 
भक्तिमय वातावरणात ‘चित्रनगरीच्या राजा’चे जल्लोषात आगमन झाले. यावेळी चित्रनगरीतील कलाकार, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठेनंतर सर्वांनी एकत्र येत गणरायाची आरती करून बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.
   राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्याचा अधिकृत महोत्सव म्हणून दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव विशेष उत्साहात साजरा केला जात आहे. पारंपरिक उत्सवी कला आणि परंपरांचे दर्शन घडविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जागतिक रील स्पर्धा, मराठी गणपती स्तोत्राचे अनावरण, पाककला स्पर्धा, रील मार्गदर्शन शिबिर, वैद्यकीय चाचणी शिबिर, दिव्यांग ऑर्केस्ट्रा, हळदीकुंकू कार्यक्रम, ‘चित्रांगण कट्टा’ तसेच कलाकार, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी वैयक्तिक वित्त व्यवस्थापन व मानसिक आरोग्य सक्षमीकरण शिबिराचा समावेश आहे. तसेच विविध दिवशी सेलिब्रिटी आरतीचेही आयोजन करण्यात आले आहे.
  चित्रनगरीच्या राजाच्या आगमनाने चित्रनगरी परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, गणेशोत्सवाच्या निमित्ताने कला, संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि मनोरंजनाचा सुंदर संगम साधला जात आहे. चित्रनगरी गणेशोत्सव समितीच्या वतीने गणेशभक्तांनी सहकुटुंब या उत्सवात सहभागी होऊन ‘चित्रनगरीच्या राजा’चे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

टिप्पण्या