'बोलीभाषा' एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीची रंगत...
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची मूळ संकल्पना असलेली आणि मराठी नाट्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी एकांकिका स्पर्धा म्हणजे 'बोलीभाषा एकांकिका स्पर्धा'. नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांनी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली. यंदा या स्पर्धेचे नववे वर्ष आहे. सध्या गोविंद चव्हाण यांच्या पश्चात त्यांची कन्या सुप्रिया चव्हाण या स्पर्धेचे आयोजन करीत आहे. 'सुप्रिया प्रॉडक्शन'तर्फे आयोजित या स्पर्धेची यंदाची प्राथमिक फेरी अलीकडेच पार पडली आणि त्यातून सात एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. या सात एकांकिकांची अंतिम फेरी गुरुवार, २९ जानेवारी रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत होणार आहे.
'सपान' (डॉक्टर्स थिएटर ग्रुप - माणदेशी), 'फ्रीडम ॲट मिडनाईट' (सृजन द क्रिएशन - मालवणी), 'पाकळ्या' (नक्षत्र कलामंच - खान्देशी), 'डिझाईन' (डॉ. टी.के.टोपे रात्र महाविद्यालय - घाटी), 'त्यात काय!' (एकदम कडक नाट्यसंस्था - घाटी), 'सत्य' (नाट्यारंभ एन.के.टी.टी. - मालवणी) आणि 'पाकिस्तानचं यान' (नाट्यांकुर - घाटी) या सात एकांकिकांमध्ये अंतिम फेरी रंगणार आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर झालेल्या एकांकिकांतून पंकज गुप्ता, दर्शन पाटील, प्रियांका जाधव, विनायक आभाळे, देवेंद्र देव आणि डॉ. मेघा गावडे यांना अभिनयाची पारितोषिके जाहीर झाली आहेत. रंगकर्मी मंगेश सातपुते व संदीप रेडकर यांनी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहिले. विविध बोलीभाषांतील एकांकिका पाहण्याची संधी रसिकांना आता मिळणार असून, सर्वांचे लक्ष स्पर्धेच्या अंतिम फेरीकडे लागले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा