'पोटरा' चित्रपटाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेल्या पोटरा या मराठी चित्रपटाला तरुणांचा हाऊसफुल प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे या चित्रपटाचे प्रदर्शन पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात शनिवारी आयोजित करण्यात आले होते. रुईया महाविद्यालय,साठे महाविद्यालय, बाकलीवाल महाविद्यालय आणि सिडनेम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या चित्रपटाला हाऊसफुल गर्दी केली.
पोटरा म्हणजे ज्वारीचे कणीस जेव्हा
परिपक्व होण्याच्या स्थितीस येते ती स्थिती. मासिक पाळी सुरु होताच मुलींचे शिक्षण थांबवून त्यांचे लग्न लावून देण्याची प्रथा आजही काही गावात काही प्रमाणात पाळली जाते.या विषयावर पोटरा हा चित्रपट संयतपणे भाष्य करतो,निर्माते शरद शिंगाडे, कलाकार छकुली देवकर आणि नंदा काटे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली.महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची प्रस्तावना केली. यावेळी चित्रपट निर्मिती प्रक्रिया आणि चित्रपटाचा अनुभव याबद्दल चित्रपटातील कलाकारांबरोबर प्रेक्षकांनी मुक्त संवाद साधला.
अत्यंत हलाखीचे जीवन जगणार्या छकुली देवकर या मुलीला या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेक मदतीचे हात पुढे आले. महाराष्ट्र चित्रपट , रंगभूमी आणि सांस्कृतिक कार्य महामंडळाने दोन लक्ष रुपयांची मदत या मुलीला दिली होती. सध्या बारामती येथे ती महाविद्यालयीन शिक्षण घेत असून तिच्या शिक्षणाचा खर्च दानशूर व्यक्तींनी उचलला आहे. पुढे शिक्षण पुर्ण करुन अभिनय करण्याचा मानस असल्याचे तिने सांगितले.
कान फेस्टीव्हलमध्ये हा चित्रपट शासनातर्फे नेण्यात आला होता तसेच पुणे आतंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार या चित्रपटास प्राप्त झाला होता.
या मातीत तयार होणारे, ग्रामीण भागातील निर्माते आणि दिग्दर्शक यांनी तयार केलेले असे दर्जेदार चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल रसिक आणि तरुण विद्यार्थांनी दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ आणि महामंडळाचे विशेष आभार मानले. अभिरुचीसंपन्न प्रेक्षक घडवण्यात हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केवळ मुंबईपुरते मर्यादित न राहता राज्यातील इतर शहरांमध्येही असे उपक्र्म आवश्यक असल्याचे अनेक रसिकांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा