सुशांत शेलार यांची गावविकासासाठी आग्रही भूमिका.
मनोरंजन, राजकारण, समाजकारण या क्षेत्रांत सक्रिय असणारे अभिनेता सुशांत शेलार हे सातत्याने नवे उपक्रम आणि समाजभिमुख कामासाठी प्रयत्नशील असतात. आता रत्नागिरी जिल्ह्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेत, त्यांनी स्थानिक प्रतिनिधींसह पालकमंत्री उदय सामंत यांची नुकतीच भेट घेतली. विविध विकासकामांचा प्रस्ताव या भेटीदरम्यान मांडण्यात आला.
यावेळी सांगवे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावामध्ये सप्तलिंगी नदीचा गाळ काढून तिचे पुनरुज्जीवन करणे, बहुउद्देशीय सभागृह उभारणे, गणेश विसर्जनासाठी सुरक्षित घाट बांधणे, गावात स्ट्रीट लाईट बसवणे तसेच नदीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करणे अशा अनेक मूलभूत सुविधांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणालाही प्राधान्य देण्यात आले असून, नदी स्वच्छता आणि परिसराचे जतन करण्यावर भर देण्यात येत आहे.
या विकासकामांसाठी पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने सुशांत शेलार यांनी मा. मंत्री महोदय उदय सामंत, योगेश कदम, संजय राठोड तसेच उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची भेट घेतली. या वेळी संबंधित कामांबाबत सकारात्मक चर्चा होऊन आवश्यक त्या उपाययोजनांबाबत मान्यवरांनी आश्वासन दिले.
याबाबत बोलताना सुशांत शेलार म्हणाले, ‘गावातील प्रत्येक नागरिकाला चांगल्या सुविधा मिळाव्यात, सुरक्षितता आणि सोयी वाढाव्यात हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचे जतन आणि प्रदूषणमुक्त परिसर घडवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सांगवेच्या विकासासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून, मान्यवर मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या काळात ही सर्व विकासकामे गतीने पूर्ण करून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यावर आमचा भर राहील.’
या शिष्टमंडळात श्री. नरेंद्र शेलार (उपाध्यक्ष, सांगवे समाज सेवा संघ), श्री. अनिल शेलार (सचिव), श्री. संजय शेलार (खजिनदार), श्री. संजय का. शेलार (सदस्य), श्री. दिनेश शेलार (सदस्य), श्री. देवदत्त शेलार (माजी सरपंच) तसेच श्री. विश्वास शेलार (उपसरपंच) यांची उपस्थिती होती. गावाच्या विकासासाठी स्थानिक पातळीवर होत असलेला हा पुढाकार कौतुकास्पद असून, या प्रस्तावित कामांमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा