'सांस्कृतिक कलादर्पण २०२६' पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न.
चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानतर्फे आयोजित २८ वा “सांस्कृतिक कलादर्पण २०२६” गौरव रजनी पुरस्कार सोहळा मंगळवार, २८ एप्रिल रोजी प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात उत्साहात पार पडला. सायंकाळी ६.३० वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याला मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती लाभली.
या वेळी यंदाचा मानाचा “सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार” ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ आणि ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ रंगकर्मी रविंद्र आवटी आणि सांस्कृतिक कलादर्पण अध्यक्ष संस्थापक चंद्रशेखर सांडवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नाटक विभागात “गोष्ट तिच्या घटस्फोटाची” या नाटकाने सर्वोत्कृष्ट नाटकाचा प्रथम पुरस्कार पटकावला, तर “फिल्टर कॉफी” आणि “लागली पैज” यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. प्रायोगिक नाटक विभागात “इथेच टाका तंबू” या नाटकाने बाजी मारली.
मालिका विभागात “लक्ष्मी निवास” (झी मराठी) या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार मिळाला, तर “लग्नानंतर होईलच प्रेम” (स्टार प्रवाह) लक्षवेधी मालिका ठरली.
चित्रपट विभागात “आदिशेष” या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब पटकावला. तसेच सुबोध भावे, अजिंक्य देव आणि नारायण जाधव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून देण्यात आला. मानसी नाईक हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान पटकावला.
विविध क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि पत्रकार यांना सन्मानित करत हा सोहळा कलाक्षेत्रातील योगदानाची दखल घेणारा ठरला. संपूर्ण कार्यक्रमात रंगतदार सादरीकरणे आणि उत्साही वातावरणामुळे उपस्थित प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव मिळाला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा