'जिओ स्टुडिओज' आणि 'मुंबई फिल्म कंपनी'कडून ‘राजा शिवाजी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित.

 'जिओ स्टुडिओज' आणि 'मुंबई फिल्म कंपनी' यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर लाँच सोहळा आज मुंबई मध्ये पार पडण्यात आला असून निर्मात्यांकडून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर, मराठी आणि हिंदी अशा दोन्हीं भाषांमध्ये, अधिकृतरित्या ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. रितेश विलासराव देशमुख यांनी दिग्दर्शन, अभिनय, लेखन आणि निर्मिती अशा सर्व जबाबदाऱ्या सांभाळलेला हा चित्रपट भारतातील सर्वश्रेष्ठ शूर योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. बाळ शिवाजी ते राजा शिवाजी पर्यंतच्या प्रवासात ‘हिंदवी स्वराज्य' स्वप्न उराशी बाळगून, ध्येयनिष्ठतेने प्रयत्न करण्याचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटात प्रचलित नसलेल्या पण अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक पैलूंना नव्या दृष्टिकोनातून सादर करण्यात आले आहे. ट्रेलरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आज या कार्यक्रमाला जिओ स्टुडिओजच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे, दिग्दर्शक-अभिनेता- लेखक रितेश विलासराव देशमुख, तसेच संजय दत्त, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, जितेंद्र जोशी, जिनिलीया देशमुख आणि संगीतकार जोडी अजय-अतुल उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले आणि चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली.
   जिओ स्टुडिओजच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनी सांगितले की, “कलाकारांचा संच आणि हृदयस्पर्शी संगीताच्या जोरावर, ‘राजा शिवाजी’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो भारताच्या आत्म्याचा, अस्मितेचा आणि समृद्ध इतिहासाचा भव्य घोष आहे. ‘जिओ स्टुडिओज’मध्ये आमची ध्येयवेडी वाटचाल नेहमीच अशा कथा साकारण्याची राहिली आहे, ज्या आपल्या मातीत खोलवर रुजलेल्या आहेत आणि तरीही जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. ‘धुरंधर’ या दुहेरी मालिकेच्या अभूतपूर्व यशाने हे ठामपणे सिद्ध केले आहे की, प्रभावी, स्वदेशी कथांशी प्रेक्षकांचे नाते अतूट असते. विशेषतः जेव्हा त्या निडरपणे आणि भव्यतेच्या परमोच्च स्तरावर मांडल्या जातात. ‘राजा शिवाजी’द्वारे आम्ही हीच परंपरा अधिक उंचीवर नेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची कथा नव्या तेजाने सजीव करत आहोत. धैर्य, दूरदृष्टी आणि हिंदवी स्वराज्याचे अद्वितीय प्रतीक, ज्यांचा विराट वारसा आजही पिढ्यानपिढ्या प्रेरणेचा अखंड स्रोत आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “या दंतकथेच्या पाठीमागची मानवी कहाणी, त्यांची अप्रतिम रणनीतिक बुद्धिमत्ता आणि अदम्य शौर्य यांना तितक्याच ताकदीने उलगडण्याची आमची जिद्द होती. रितेश आणि त्यांच्या टीमने केवळ दृश्यवैभवापलीकडे जाऊन, एका नेत्याच्या घडणीचा प्रवास, त्यांची मूल्ये आणि त्यांना आकार देणाऱ्या शक्तींचा सखोल व प्रभावी वेध घेणारी कथा घडवली आहे. अस्सलता, अफाट भव्यता, दमदार कलाकारांचा ताफा आणि आत्म्याला भिडणारे संगीत यांच्या जोरावर ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट आमच्या भारतीय कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत तितक्याच ताकदीने आणि तितक्याच हृदयस्पर्शीपणे पोहोचवण्याच्या आमच्या अढळ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हा केवळ एक सिनेमॅटिक अनुभव नाही, तर भारताच्या अभिमानाला वाहिलेली प्रभावी आदरांजली आहे; जी आपल्या इतिहासाच्या पानांना नव्या तेजाने जिवंत करते आणि प्रत्येक पिढीच्या मनात अभिमानाची ज्योत प्रज्वलित करते.”
    एका साध्या आणि संघर्षमय सुरुवातीपासून ते एका अजिंक्य योद्धा-राजाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीवर केंद्रित आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य आणि पॅन-इंडिया स्तरावर उभा राहणाऱ्या प्रकल्पांपैकी एक म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जात असून, त्याची व्यापकता, नेत्रदीपक दृश्यरचना, थरारक ॲक्शन आणि उच्च दर्जाची तांत्रिक मांडणी यांमुळे तो आधीपासूनच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. आता प्रदर्शित झालेला ‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच उंचावणार आहे.
   या चित्रपटात हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र आले आहेत. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांचा समावेश आहे.
   'जिओ स्टुडिओज प्रस्तुत' आणि 'मुंबई फिल्म कंपनी' निर्मित ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वाभिमान आणि प्रेरणादायी जीवनप्रवास भव्य आणि नेत्रदीपक पद्धतीने मोठ्या पडद्यावर साकारला जाणार असून, हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...