‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा साधू अवतार चर्चेत.
झी स्टुडिओजच्या 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाच्या टीझरनंतर चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटासह या चित्रपटातील अजून एका गोष्टीची चर्चा रंगली आहे. ती म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या खास विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे मकरंद अनासपुरे यांच्या भूमिकेची. लोकप्रिय अभिनेता मकरंद अनासपुरे पुन्हा एकदा नव्या आणि लक्षवेधी अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटात ते एका साधूच्या भूमिकेत झळकणार असून, त्यांच्या या लूकची सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
चित्रपटातील त्यांच्या गेटअपने पहिल्याच नजरेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लांब केस, दाट दाढी, कपाळावर ठसठशीत टिळा, गळ्यात माळा आणि अंगावर पारंपरिक वेशभूषा असा साधूचा अवतार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. साधूची भूमिका असली तरीही त्यांच्या मिश्कीलपणाची व खुमासदार अंदाजाची झलक टीझरमध्ये दिसून येते. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांची सहजता आणि देहबोलीमुळे या व्यक्तिरेखेला एक वेगळाच रंग मिळाला आहे.
मकरंद अनासपुरे यांनी यापूर्वीही विविध छटांतील भूमिका साकारल्या आहेत, मात्र साधूच्या गेटअपमध्ये त्यांचा हा विनोदी अंदाज प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. या कॉमेडी -हॉरर चित्रपटातील त्यांची भूमिका कथेला हलकेफुलके वळण देणारी ठरणार आहे.
आपल्या भूमिकेबद्दल मकरंद अनासपुरे म्हणतात, ‘’ ‘तुंबाडची मंजुळा’ करताना मला एक वेगळाच आणि समृद्ध अनुभव मिळाला. दिग्दर्शक विविध कोरगावकर हा नवीन असला, तरी त्याने हा चित्रपट अत्यंत संवेदनशीलतेने आणि प्रभावीपणे हाताळला आहे. या चित्रपटात मी आजवर कधीही न साकारलेली, थोडी वेगळी अशी ‘भोंदू महाराज’ ही भूमिका साकारली आहे, जी माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होती. या भूमिकेसाठीचा वेगळा लुक तयार करण्यासाठी मेकअपमॅन सचिन गिलबिले आणि कुंदन दिवेकर यांनी खूप मेहनत घेतली असून वेशभूषाकाराने दिलेल्या अनोख्या पेहरावामुळेही माझी भूमिका अधिक उठून दिसते. या लूकचं विशेष म्हणजे चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर माझ्या आईलासुद्धा साधूच्या भूमिकेत मीच आहे हे ओळखता आलं नाही. त्यामुळे हा लुक किती वेगळा आणि प्रभावी झाला आहे, याची मला जाणीव झाली. ही विनोदी भूमिका साकारण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तो प्रेक्षकांना कितपत भावतो, हे मात्र चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल.’’ या चित्रपटात जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व रुके, नवोदित अभिनेत्री प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी हे कलाकार आहेत. ऋषिकेश तुरई यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विविध कोरगांवकर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने केले आहे. झी स्टुडिओजतर्फे उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या ५ जून रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा