‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत मुंबईत देशभक्तीपर चित्रपट महोत्सव.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ या देशव्यापी अभियानांतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत देशभक्तीपर चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता एनएफडीसीच्या ऑडिटोरियम-२, मध्ये महोत्सवाचे उद्घाटन संपन्न होणार आहे. यावेळी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील आणि प्रसिद्ध अभिनेते शरद केळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 
१४ ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत एनएमआयसी, एनएफडीसी-एफडी कॉम्प्लेक्स, ऑडिटोरियम-२, पेडर रोड, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामध्ये १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.२० वाजता ‘अ साँग इटर्नल' वंदे मातरम आणि ४.३० वाजता ‘क्रांती’ या चित्रपटांचे प्रदर्शन होईल.१५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ‘अवर फ्लॅग’, ११.१५ वाजता ‘शहीद’, दुपारी ३ वाजता ‘लोकमान्य टिळक’ आणि ३.२० वाजता ‘आमरण’ हे चित्रपट प्रदर्शित केले जातील.१६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ‘ग्लोरी ऑफ महाराष्ट्रा –अ फ्रीडम स्ट्रगल’, ११.३० वाजता ‘उरी’, दुपारी २.३० वाजता 'महामृत्युंजय भगतसिंग' ३ वाजता ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.
  या महोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांचे त्याग व बलिदान, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास तसेच आधुनिक भारताच्या उभारणीत योगदान देणाऱ्या वीरांच्या कार्याला चित्रपटांच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात येणार आहे. या चित्रपटांची निवड उप महाव्यवस्थापक ( संग्रहालय) सत्यजित मंडले यांनी केले आहे. 
   या महोत्सवात देशभक्तीपर चित्रपट, ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपट तसेच माहितीपट रसिकांना पाहता येणार आहेत. महोत्सवातील सर्व चित्रपटांचे प्रदर्शन विनामूल्य असून, चित्रपटप्रेमींनी या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदुम यांनी केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.