नाटक ते चित्रपट अभिनेत्री श्रुती मधुदीपचा दैदीप्यमान प्रवास.

नावापासूनच उत्सुकता निर्माण केलेल्या ‘पाच फुटाचा बच्चन’ या चित्रपटातील बच्चन कोण? या रहस्याचा उलगडा आता झाला आहे. युवा अभिनेत्री श्रुती मधुदीप या चित्रपटातून "पाच फुटाचा बच्चन" या भूमिकेतून पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे, मूळ नाटकातही श्रुतीनंच ही भूमिका साकारली होती. "पाच फुटाचा बच्चन" हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज् यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिश दाते, किशोर कदम, आशय कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील, विनोद वणवे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
   नाटक, शॉर्टफिल्म्समध्ये काम केल्यानंतर श्रुती मधुदीप ‘पाच फुटाचा बच्चन’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. पदार्पणातच प्रमुख भूमिका साकारलेली श्रुती मधुदीप चित्रपटाविषयी म्हणाली, “लहानपणापासूनच माझा कल कला क्षेत्राकडे होता. त्यामुळे गाणे, नाच, अभिनयाच्या संधी मला खुणावायच्या. आठ वर्ष कथक शिकल्यानंतर कालांतराने नाटकात काम करू लागले. अभिनय करताना आपल्याला सगळ्यात आनंदी वाटतं आणि तल्लीन होता येतं,हे समजल्यावर मी अनेक नाट्यप्रयोग, शॉर्टफिल्म्समध्ये स्वत:ला, कथेला आजमावून बघितलं. त्यातच मला सुमित्रा भावे या ज्येष्ठ दिग्दर्शिकेसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडे मी सहाय्यक म्हणून काम करताना मला चित्रपट हे माध्यम अधिक समजत गेलं. कथा, आशयाकडे पाहण्याची स्पष्टता, कलाकार म्हणून कसं जगायचं याचा वस्तूपाठ मिळाला. त्यातूनच त्यांच्या ‘साखरेपेक्षा गोड’ नावाच्या शॉर्टफिल्ममध्ये मला मुख्य भूमिका मिळाली. या दरम्यानच ‘पाच फुटाचा बच्चन‘ नाटक सुरू झालं. माझ्यासारख्या शहरी मुलीला या कथेमुळे कोल्हापूरच्या रांगड्या मुलीचं पात्र मिळालं  आणि खजिना सापडल्यासारखे वाटलं. नाटकाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हे नाटक करणं, त्या नाटकाचा सिनेमा होणं, आणि त्यात माझी मध्यवर्ती भूमिका असणं, हे स्वप्नवत आहे. मुख्य भूमिका साकारत असलेला माझा हा पहिलाच सिनेमा येतो आहे. त्यामागचा सगळा प्रवास माझ्यासाठी खूप समृद्ध करणारा आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.