बादशाहच्या रॅपने दिला 'चिमणा'ला नवा साज!'गोंधळ’च्या पारंपरिक लोकगीताची जगभरात चर्चा.

वेगळा आशय, ग्रामीण संस्कृतीशी जोडलेली कथा आणि प्रभावी मांडणी यामुळे ‘गोंधळ’ या चित्रपटाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. देश-विदेशातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद, उत्कृष्ट दिग्दर्शन, प्रभावी सिनेमॅटोग्राफी आणि दमदार कथानकासाठी मिळालेले पुरस्कार यामुळे ‘गोंधळ’ने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता या चित्रपटातील एक पारंपरिक लोकगीत थेट जागतिक स्तरावर पोहोचले आहे. ‘गोंधळ’मधील ‘एक चिमणा चिवचिवला’ या रॉ आणि अस्सल लोकगीताला लोकप्रिय रॅपर बादशाहने आपल्या खास रॅपचा तडका देत नवे रूप दिले असून नुकतेच प्रदर्शित झालेले हे गाणे रसिकांच्या पसंतीस उतरत आहे. विशेष म्हणजे हे गाणं सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. 
‘चिमणा’ या नावाने प्रदर्शित झालेल्या या गाण्यात दिव्या कुमार, बादशाह, नागेश मोर्वेकर आणि नेहा खान यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. पारंपरिक लोकसंगीताचा बाज कायम ठेवत त्याला आधुनिक रॅप आणि दमदार बीट्सची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे या गाण्याचे पारंपरिक रूप आणि आधुनिक सादरीकरण यांचा भन्नाट मेळ साधला गेला आहे. ऐकताना आणि पाहातानाही हे गाणे एक वेगळ ठरलं. विशेष म्हणजे, ‘एक चिमणा चिवचिवला’ हे ‘गोंधळ’मधील पारंपरिक लोकगीत असून, बादशाहने त्याला आपल्या शैलीत रॅपच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत आणि जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहे. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या या लोकगीताला आधुनिक संगीताचा साज चढवत जागतिक स्तरावर नेल्याबद्दल ‘गोंधळ’च्या टीमने बादशाहसह संपूर्ण गाण्याच्या टीमचे आभार मानले आहेत.
‘गोंधळ’ची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांचे असून, डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे यांच्यासह अनेक अनुभवी कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटाला बळ दिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.