अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई आयोजित खुला राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सव "नाट्य परिषद करंडक"
रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला 'नाट्यकलेचा जागर' भव्य राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा महोत्सवात सलग तिसऱ्या वर्षी देखील 'नाट्य परिषद करंडक' रूपात आयोजित करण्यात आला आहे असे परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी हा स्पर्धात्मक महोत्सव राज्यस्तरावर आयोजित केला असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा असे आवाहन उपाध्यक्ष (उपक्रम) श्री. भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.
मागील वर्षी हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर यशस्वीरित्या सादर झाला. मागील वर्षी २५८ एकांकिका या महोत्सवात सादर झाल्या, अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री यांनी गावोगावी जाऊन हे शिबिर घेतले. यामुळे अंतिम फेरीतील एकांकिका दर्जेदार झाल्या आणि यातून मागील वर्षी नाट्य परिषद करंडक स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त एकांकिका “चिरंजीव परफेक्ट बिघडलाय” या एकांकिकेचे व्यावसायिक नाटकात रूपांतर करून व्यावसायिक रंगभूमीवर हे नाटक सादर करण्यात आले आणि नाटकाचे आजअखेर १०० नाट्यप्रयोग झाले असून त्यातील २५ प्रयोग महाराष्ट्रभारतील नाट्य परिषदेच्या शाखांमध्ये सादर करण्यात आले, अशी माहिती अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांनी दिली.
दरवर्षी 'नाट्य परिषद करंडक' ह्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ व कार्यकारी समितीने ठरविले आहे. तसेच १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त सुरू करण्यात आलेला 'नाट्यकलेचा जागर' यातील एकपात्री स्पर्धा, नाट्यअभिवाचन स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन प्रवेश स्पर्धा यांचा देखील स्पर्धा महोत्सव घेण्याचा परिषदेचा मानस आहे.
नाट्य परिषद करंडक ही स्पर्धा प्राथमिक, विभागीय व अंतिम फेरी अश्या तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे. प्राथमिक फेरी सप्टेंबर अखेर विविध केंद्रांवर होऊन यातील निवडक कलाकृतींची विभागीय फेरी तर अंतिम फेरी मुंबई येथे दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा - माहीम, मुंबई येथे होणार आहे.
अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकांकिका स्पर्धा घेण्याचा नाट्य परिषदेचा मानस आहे. ज्या जिल्ह्यातून किमान १० प्रवेशिका येतील त्याठिकाणी स्पर्धेचे केंद्र देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कलाकारांना नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट एकांकिकेका व्यावसायिक रंगभूमीवर व्हावी यासाठी नाट्य परिषद प्रयत्नशील राहणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा