‘बंधू’ने चित्रपताका महोत्सवाचे उद्घाटन; ‘गोंधळ’ सिनेमाच्या प्रदर्शनाने होणार समारोप.
मराठी चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण आशय, सर्जनशीलता आणि कलात्मक अभिव्यक्तीचा उत्सव असलेल्या ‘चित्रपताका – २०२६’ या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अभिनेते उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘बंधू’ने ‘चित्रपताका’ महोत्सवाचे उद्घाटन, तर १८ नोव्हेंबरला ‘गोंधळ’ या भारतातर्फे ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका मिळालेल्या सिनेमाच्या प्रदर्शनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या चार दिवसीय महोत्सवात मराठी चित्रपटांचे वैविध्यपूर्ण विषय, आशयघन कथा आणि चित्रपट माध्यमातील विविध प्रयोग रसिकांना अनुभवता येणार आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या शुभहस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात संपन्न होणाऱ्या या चार दिवसीय महोत्सवात तब्बल ३३ आशयघन सिनेमे, जवळपास २० सिनेमाविषयक संवादसत्रे आणि उपक्रमाची पर्वणी सिनेरसिकांना अनुभवता येणार आहे.
‘चित्रपताका’ महोत्सवाच्या उद्घाटन आणि समारोपासाठी निवडण्यात आलेले दोन्ही चित्रपट मानवी नातेसंबंध आणि भावभावनांचे वेगवेगळे पैलू उलगडणारे आहेत. महोत्सवाचा उद्घाटकीय सिनेमा असलेला ‘बंधू’ हा अद्याप अप्रदर्शित असून तो पाहण्याची संधी या महोत्सवामुळे रसिकांना मिळणार आहे. उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रभावी अभिनयाने सजलेला हा सिनेमा दोन भावांच्या भावविश्वाचा आणि त्यांच्या नात्यातील चढ-उतारांचा मागोवा घेतो. मतभेदांच्या पलीकडे जपले जाणारे प्रेम, शब्दांविना व्यक्त होणाऱ्या भावना आणि एकमेकांच्या आनंदासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी, अशा अनेक भावछटांतून भावबंधांचे अनोखे रूप या चित्रपटात उलगडते. भावनिक नात्यांची ही हृदयस्पर्शी कथा महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांसमोर येणार आहे.तर महोत्सवाचा समारोपीय सिनेमा असलेल्या ‘गोंधळ’ या चित्रपटास भारतातर्फे ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका मिळाली असून ‘चित्रपताका’ने त्यास महोत्सवाच्या समारोपीय सिनेमाचा मान दिला आहे. या सिनेमात पारंपरिक गोंधळ विधीनाट्याच्या पार्श्वभूमीवर मानवी मनातील गुंतागुंतीच्या भावभावनांचा वेध घेण्यात आला आहे. एका गावात घडणाऱ्या घटनांच्या माध्यमातून प्रेम, ईर्षा, अपमान, विश्वासघात आणि सूड अशा परस्परविरोधी भावनांचे नाट्य चित्रपटात उलगडत जाते. बाहेर भक्तीचा जागर सुरू असताना प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे द्वंद्व सुरू आहे, अशा दोन समांतर प्रवाहांतून चित्रपटाची कथा पुढे सरकते. पारंपरिक लोककलाविष्काराची पार्श्वभूमी आणि मानवी स्वभावातील गुंतागुंत यांचा संगम साधणाऱ्या ‘गोंधळ’ चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
याशिवाय अन्य नवीन, आशयघन २८ मराठी सिनेमे आणि ‘सांगते ऐका’, ‘पिंजरा’, ‘उंबरठा’ हे जुने अभिजात मराठी चित्रपट, तसेच विविध विषयांवरील चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा अशा उपक्रमांचाही महोत्सवात समावेश आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आशयवैविध्य आणि कलात्मक सामर्थ्याचा उत्सव ठरणाऱ्या या महोत्सवात सहभागी होण्यासाठी महोत्सवाच्या https://tktplz.events/gject6-chitrapataka-marathi-film-festival या अधिकृत संकेतस्थळावरू नावनोंदणी करावी. चार दिवसांच्या महोत्सवासाठी नाममात्र १०० रुपये शुल्क असून नोंदणी शुल्कातून जमा होणारा महसूल दुष्काळ निवारण कार्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द केला जाणार आहे. कलेचा आनंद देणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासणाऱ्या या महोत्सवाची प्रेक्षकनोंदणी सुरू असून अधिकाधिक सिनेरसिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा