‘चित्रपताका’त विविध संवादसत्रांतून होणार सिनेमंथन....अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते,लेखक आणि चित्रपट अभ्यासक साधणार रसिकांशी संवाद.
मराठी चित्रपटांचा आस्वाद घेण्याबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतील बदलते प्रवाह, नवनवीन प्रयोग, आव्हाने आणि भविष्यातील संधी यांवरील सिनेमंथनात सहभागी होण्याची संधी ‘चित्रपताका–२०२६’ या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत मराठी चित्रपट महोत्सवातून सिनेरसिकांना मिळणार आहे. १५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात रंगणाऱ्या या महोत्सवात ७ परिसंवाद, ३ विशेष मुलाखती व ७ कार्यशाळा होणार असून ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, सचिन पिळगांवकर, ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्याशी होणारा संवाद हे यंदाच्या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजित या चार दिवसीय महोत्सवाचे रविवारी, १५ नोव्हेंबर रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार असून सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. महोत्सवातील विविध संवादसत्रांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, जाहिराततज्ज्ञ आणि चित्रपट अभ्यासक सहभागी होणार असून, मराठी सिनेमाच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा आणि विचारमंथन घडणार आहे.
१६ नोव्हेंबर रोजी ‘गावकुसातला मराठी सिनेमा’ या परिसंवादाने या विचारमंथनाला सुरुवात होईल. पुणे-मुंबईपलीकडील ग्रामीण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून पुढे आलेल्या नव्या दिग्दर्शकांनी मराठी सिनेमाला दिलेली नवी दिशा, त्यांचे कथाविषय, चित्रभाषा, अनुभव आणि भविष्यातील शक्यता यांवर या परिसंवादात चर्चा होईल. हरीश इथापे, मंगेश बदर, रावबा गजमल, शेखर रणखांबे आणि विजय कळमकर सहभागी होणार असून, अभिनेते संदीप पाठक सूत्रसंचालन करतील. त्याच दिवशी ‘तिचं ‘नायिका’ होणं!’ या परिसंवादातून मराठी चित्रपटांमधील स्त्रीप्रतिमेचा बदलता प्रवास उलगडला जाणार आहे. ‘भूमिकांचे भान आणि ‘स्व’ची ओळख’ या मध्यवर्ती संकल्पनेभोवती रंगणाऱ्या या चर्चेत अभिनेत्री अलका कुबल, वर्षा उसगांवकर, छाया कदम, सायली संजीव आणि प्राजक्ता माळी सहभागी होतील.
१७ नोव्हेंबर रोजी ‘अॅडगुरूंचा सल्ला...’ हा परिसंवाद होईल. मराठी सिनेमाची जाहिरात, विपणन आणि प्रसिद्धीतंत्रे हा त्याचा विषय आहे. भरत दाभोळकर, रवि जाधव, ज्योती देशपांडे, राज कांबळे आणि सुनील महाडिक या परिसंवादात सहभागी होतील. दिग्दर्शक विजू माने या परिसंवादाचे सूत्रसंचालन करतील. १७ नोव्हेंबरलाच ‘मराठी सिनेमा पैलतिरावरून…’ हाही परिसंवाद रंगणार आहे. मराठी भाषक नसलेल्या चित्रपटकर्मींच्या नजरेतून मराठी सिनेमाचे स्थान, त्याची वैशिष्ट्ये आणि इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टींच्या तुलनेतील त्याचे स्थान यांचा वेध घेणाऱ्या या परिसंवादात नितीन कक्कर, अमित राय आणि सूरज सिंग सहभागी होतील. तर नरेंद्र बंडबे या चर्चेचे सूत्रसंचालन करतील. तसेच ‘आजचा मराठी सिनेमा’ या परिसंवादातून आजच्या मराठी सिनेमासमोरील कळीच्या प्रश्नांवर मंथन होईल. सुहृद गोडबोले, अमृता राव, दिग्पाल लांजेकर, आदित्य सरपोतदार आणि प्रवीण तरडे या परिसंवादात सहभागी होतील, तर सिनेपत्रकार सौमित्र पोटे या परिसंवादाचे सूत्रसंचालन करतील.
१८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘साहित्य ते सिनेमा’ या परिसंवादात बदलत्या काळानुसार साहित्य आणि सिनेमाच्या परस्परसंबंधांना मिळू शकणारी नवी दिशा यांचा ऊहापोह होईल. लेखक श्रीकांत बोजेवार, दिग्दर्शक सुजय डहाके आणि लेखक-कलाकार श्वेता पेंडसे सहभागी होतील. लेखक अरविंद जगताप या चर्चेचे सूत्रसंचालन करतील. त्याच दिवशी ‘ओटीटीवरी मराठी असावे!’ या परिसंवादात डिजिटल माध्यमांमुळे बदललेले चित्रपट वितरण, स्वतंत्र मराठी ओटीटी व्यासपीठांचा उदय, बदलती व्यावसायिक समीकरणे आणि प्रेक्षकांच्या बदलत्या सवयी यांचा वेध घेतला जाईल. दिग्दर्शक केदार शिंदे, निखिल साने, सारंग साठ्ये, राजेश पाठक आणि विराज चव्हाण यात सहभागी होतील. अमोल परचुरे या परिसंवादाचे सूत्रसंचालन करतील.
परिसंवादांबरोबरच चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या कारकिर्दीचा, अनुभवांचा आणि कलाप्रवासाचा मागोवा घेणाऱ्या तीन विशेष मुलाखती हे महोत्सवाचे आणखी एक आकर्षण असेल. १६ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगांवकर यांची ‘हाच माझा मार्ग...’ या सत्रात विशेष मुलाखत होईल. १७ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्याशी संवाद साधला जाणार असून सहा दशकांहून अधिक काळ आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि अचूक विनोदी टायमिंगने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या शुभा खोटे यांच्या हिंदी-मराठी चित्रपटांतील कारकिर्दीतील आठवणी आणि अनुभव या मुलाखतीतून जाणून घेता येतील. तर १८ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या विशेष मुलाखतीतून रंगभूमीपासून चित्रपटसृष्टीपर्यंतचा त्यांच्या प्रदीर्घ प्रवासाविषयी संवाद साधला जाणार आहे.
याशिवाय महोत्सवात ७ विशेष कार्यशाळा होणार आहेत. त्यात दिग्दर्शक ओम राऊत हे भव्य सिनेमे साकारण्याविषयीचे अनुभव मांडतील, तर दिग्दर्शक उमेश कुलकर्णी हे जागतिक क्षितीजावर मराठी सिनेमा नेमका कुठे आहे, याचा वेध घेतील. याशिवाय सिनेमाचे ध्वनी व संगीत या विषयावर ध्वनीसंकलक मंदार कमलापूरकर, नृत्य दिग्दर्शनाबाबत फुलवा खामकर, छायाचित्रणाबद्दल महेश अणे, सिनेमातील एआयचा तंत्राविष्काराबद्दल तेजस देऊस्कर यांच्या कार्यशाळा होतील. तर माध्यमकर्मी आणि चित्रपटविषयक लेखन करू इच्छिणाऱ्यांसाठी सिनेअभ्यासक मिलिंद दामले यांचे सिनेमाची ‘माध्यम’ मधून ओळख करून देणारी विशेष कार्यशाळादेखील महोत्सवात आयोजित करण्यात आली आहे.
चित्रपटांच्या प्रदर्शनासोबतच त्यामागील सर्जनशील प्रक्रिया, कलाकारांचे अनुभव, चित्रपट व्यवसायातील बदल आणि मराठी सिनेमाच्या भवितव्याविषयी मोकळा संवाद घडवून आणणाऱ्या या संवादसत्रांतून चित्रपटप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी आणि नवोदित चित्रपटकर्मींना नवे विचार, अनुभव आणि प्रेरणा मिळणार आहेत. महोत्सवाची नोंदणी https://tktplz.events/gject6-chitrapataka-marathi-film-festival या संकेतस्थळ दुव्यावर करता येणार असून जास्तीत जास्त सिनेप्रेमींनी या सिनेमंथनात सहभागी व्हावे, असे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा