"चित्रपटाला ‘माध्यम’ म्हणून समजून घेण्याची गरज"- सिनेअभ्यासक मिलिंद दामले यांचे प्रतिपादन.

 पडद्यावर दिसणाऱ्या सिनेमामागे लेखनाची आणि प्रत्यक्ष निर्मितीची वर्षानुवर्षांची तपश्चर्या असते. वरवरच्या विचाराने सिनेमावर सहज टीका करणे सोपे असते, पण सिनेमा बनवणे म्हणजे एक डोंगर सर करून दुसरा डोंगर चढण्यासारखा कठीण संघर्ष असतो. त्यामुळे सिनेमावर भाष्य करताना त्या कलाकृतीमागील मेहनत ध्यानात घेणे आवश्यक आहे. तसेच सिनेमाचा ‘माध्यम’ म्हणून विचार करून त्याचा आस्वाद घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सिनेअभ्यासक मिलिंद दामले यांनी केले. ‘चित्रपताका’ महोत्सवात सोमवारी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. 
सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने आयोजित ‘चित्रपताका’ हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव रविवारपासून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात सुरू आहे. या चार दिवसीय महोत्सवात सोमवारी ‘अथातो सिनेजिज्ञासा’ ही एफटीआयआय, पुणे येथील सहप्राध्यापक व सिनेअभ्यासक मिलिंद दामले यांची कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी सिनेमा माध्यमाचा सखोल परिचय करून घेण्याची गरज अधोरेखित करताना मिलिंद दामले म्हणाले की, चित्रपटविषयक लेखन, समीक्षा, वृत्तांकन, मुलाखती आणि चित्रपटांची प्रसिद्धी करताना सिनेमा व प्रसारमाध्यम यांच्यातील परस्परसंबंध आणि सिनेमाचे माध्यम म्हणून असलेले निरनिराळे पैलू समजून घ्यायला हवेत. मुंबईत १३० वर्षांपूर्वी सिनेमाचा पहिला खेळ आयोजित केला गेला, तेव्हापासून सिनेमा ही कला आपल्या इथे रुजली आहे. आज भारत हा जगात सर्वाधिक चित्रपट बनवणारा देश बनला आहे. पण सिनेमाकलेकडे पाहताना माध्यम म्हणून त्याचा परिचय करून घ्यायला हवा. सिनेमात सर्व कलांचा मेळ असतो आणि सिनेमाच्या निर्मितीमागे एक विचार असतो. त्यातून माध्यम म्हणून सिनेमाध्यमाला विशिष्ट स्वरूप प्राप्त झाले असून ते सतत बदलत, उत्क्रांत होत आहे. ही प्रक्रिया जाणून घेतली, तर सिनेमा केवळ ‘पाहण्या’पेक्षा त्याचा खऱ्या अर्थाने आस्वाद घेतला जाईल, असे मत मिलिंद दामले यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महोत्सवाचे संचालक पुरुषोत्तम बेर्डे, महोत्सवाचे क्युरेटर डॉ. संतोष पाठारे यांच्यासह सिनेरसिक उपस्थित होते. 
   चित्रपटाच्या अनुभवाला समृद्ध करणाऱ्या ध्वनीसंकलन आणि संगीतरचनेच्या प्रक्रियेची ओळख करून देणारी ‘स्वर-नाद-निनाद’ ही प्रसिद्ध ध्वनीसंकलक मंदार कमलापूरकर यांची कार्यशाळा सोमवारी ‘चित्रपताका’त संपन्न झाली. चित्रपटांतील ध्वनींची निवड, त्यांचे संकलन आणि संगीताची निर्मिती यांमागील तांत्रिक व कलात्मक पैलू कमलापूरकर यांनी या सत्रात उलगडले. संगीत हा ध्वनीचा प्रभावी प्रकार असून तो वय आणि लिंग यांसारख्या भेदांच्या पलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तीशी जोडला जातो, असे सांगत त्यांनी माणसाच्या आयुष्यात आवाजाचे महत्त्व अधोरेखित केले. शोले, तुंबाड, घरत गणपती, धर्मवीर यांसारख्या सिनेमांतील आणि विविध जाहिरातींतील दृश्यांच्या उदाहरणाद्वारे त्यांनी ध्वनीमुळे दृश्याचा मूड, भावना आणि परिणाम कशाप्रकारे बदलतात, हे स्पष्ट केले. या सत्रातून चित्रपटाच्या प्रभावी सादरीकरणामध्ये ध्वनीसंयोजनाची महत्त्वपूर्ण भूमिका मंदार कमलापूरकर यांनी समजून सांगितली. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...