‘चित्रपताका’त ‘आजचा मराठी सिनेमा’ परिसंवाद रंगला.

आज मराठी चित्रपट हाऊसफुल होत असले, तरी पुणे आणि मुंबईच्या पलीकडेही मोठा महाराष्ट्र आहे, हे लक्षात घेऊन चित्रपटांचे मार्केटिंग केले पाहिजे. मराठी चित्रपटांची बाजारपेठ मोठी असून, योग्य नियोजन आणि प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचण्याच्या प्रयत्नांतून मराठी सिनेमा ५०० कोटी रुपयांचा व्यवसाय करू शकतो, असा विश्वास दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केला. ‘चित्रपताका’त मंगळवारी आयोजित ‘आजचा मराठी सिनेमा’ या विषयावरील परिसंवादात  ते बोलत होते. 
सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सवाचे १५ नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचा हा अधिकृत महोत्सव प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात संपन्न होत आहे. या चार दिवसीय महोत्सवात मंगळवारी ‘आजचा मराठी सिनेमा’ या विषयावरील विशेष परिसंवाद रंगला. सिनेकर्मी अमृता राव, आदित्य सरपोतदार, सुहृद गोडबोले आणि प्रवीण तरडे यात सहभागी झाले, तर सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.  मराठी चित्रपटांचा आशय आणि निर्मितीचा दर्जा उंचावत असला, तरी बदलत्या प्रेक्षकांच्या आवडीनिवडी, प्रभावी मार्केटिंग आणि राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्याची क्षमता या गोष्टी मराठी सिनेमाच्या व्यावसायिक यशासाठी निर्णायक ठरणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीची सामान्य प्रेक्षकांशी तुटलेली नाळ पुन्हा जोडण्यापासून ते बंद पडलेली चित्रपटगृहे सुरू करण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर ‘आजचा मराठी सिनेमा’ या परिसंवादात सविस्तर चर्चा झाली. यावेळी आपल्या चित्रपटांच्या मार्केटिंगसाठी मोठ्या जाहिरात माध्यमांवर किंवा मोठ्या वाहिन्यांवर अवलंबून न राहता गावोगावी जाऊन प्रचार केल्याचे सांगत दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले की, मराठी चित्रपटांची बाजारपेठ विस्तारण्यासाठी ग्रामीण आणि निमशहरी भागातील प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेवून नियोजन करण्याची गरज आहे.तर आजचा मराठी सिनेमा उत्कृष्ट आहे; मात्र प्रेक्षकांची आवड आणि अपेक्षा सातत्याने बदलत आहेत. त्यामुळे चित्रपटांची निर्मिती करताना या बदलांचा विचार करणे आवश्यक आहे, असे निर्माता-दिग्दर्शक अमृता राव यांनी सांगितले. हिंदी चित्रपटसृष्टीचे वर्चस्व मराठी चित्रपटांसाठी मारक ठरत असल्याचे निरीक्षणही त्यांनी यावेळी नोंदवले. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाले की, आपला चित्रपट प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक प्रेक्षकवर्गात चालेल, अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. वेगवेगळ्या भागांतील प्रेक्षकांची आवड, त्यांची चित्रपट पाहण्याची पद्धत आणि त्यांच्या अपेक्षा समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची रणनीती आखली पाहिजे. प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नव्या पिढीतील दिग्दर्शकांच्या प्रयोगशीलतेतून मराठी सिनेमा घडत असून, त्यातून चित्रपटसृष्टीला नवी दिशा मिळत असल्याचेही त्यांनी याप्रसंगी नमूद केले.
याशिवाय मराठी चित्रपटांच्या विपणनावर भर देत सिनेकर्मी सुहृद गोडबोले म्हणाले की, मराठी चित्रपट बनवणे तुलनेने सोपे असले, तरी त्याचे योग्य मार्केटिंग करणे अधिक आव्हानात्मक आहे. मराठी चित्रपटसृष्टीची सामान्य प्रेक्षकांशी असलेली नाळ तुटली असून ती पुन्हा जोडण्याची गरज आहे. प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांकडे वळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील. चित्रपटांच्या व्यावसायिक बाजूविषयी चर्चा करणे चुकीचे नसून निर्मिती आणि व्यवसाय यांचा परस्पर संबंध समजून घेणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले. मराठी चित्रपटसृष्टीत चांगल्या चित्रपटांच्या निर्मितीमध्ये सातत्याचा अभाव असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. वर्षातून एखादा चांगला चित्रपट प्रदर्शित होणे पुरेसे नाही; दर महिन्याला दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांसमोर येणे गरजेचे आहे. सातत्याने चांगले चित्रपट प्रदर्शित झाले, तर प्रेक्षकांचा चित्रपटसृष्टीवरील विश्वास आणि चित्रपटगृहांशी असलेले नाते अधिक दृढ होईल, असे गोडबोले यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...