‘चित्रपताका’च्या दुसऱ्या पर्वाची उत्साहात सांगता.

मराठी चित्रपटांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देतानाच त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसंस्कृतीशी जोडण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत मराठी चित्रपट महोत्सव ‘चित्रपताका’च्या दुसऱ्या पर्वाचा बुधवारी, १८ नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात १५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या चार दिवसीय महोत्सवात ३३ मराठी चित्रपटांचे प्रदर्शन, तसेच परिसंवाद, मास्टरक्लास, मुलाखती अशी १५ हून अधिक संवादसत्रे आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे पाच हजार प्रेक्षकांनी महोत्सवाला उपस्थिती लावत दिलेला प्रतिसाद हे यंदाच्या पर्वाचे ठळक यश ठरले. 
सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सवाचे १५ नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या चार दिवसीय महोत्सवाची यशस्वी सांगता बुधवारी झाली. ‘गोंधळ’ या भारतातर्फे ऑस्करसाठी अधिकृत नामांकन प्रवेशिका मिळालेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचा समारोप करण्यापूर्वी रवींद्र नाट्यमंदिर येथे समारोप सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महोत्सवाचे संचालक पुरुषोत्तम बेर्डे, क्युरेटर डॉ. संतोष पाठारे, तसेच सिनेकर्मी आणि सिनेरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. तर नृत्यदिग्दर्शक सोनिया परचुरे यांच्या ‘शरयू नृत्य कला मंदिरा’तर्फे ‘हे नदे सरिते’ हा नृत्याविष्कार यावेळी सादर करण्यात आला.
महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्या याप्रसंगी म्हणाल्या की, चित्रपट पाहणे, त्यावर चर्चा करणे, चित्रपट निर्मितीच्या विविध पैलूंचा अभ्यास करणे, दिग्गजांचे अनुभव ऐकणे आणि नव्या पिढीतील कलावंतांच्या आकांक्षा समजून घेणे, अशा अनेक स्तरांवर हा महोत्सव समृद्ध करणारा ठरला. महोत्सवात नोंदणीपासून प्रत्यक्ष चित्रपट प्रदर्शन आणि संवादसत्रांपर्यंत प्रेक्षकांचा सहभाग सातत्याने जाणवत राहिला. चार दिवसांत सुमारे ५ हजार प्रेक्षकांनी महोत्सवातील चित्रपट प्रदर्शन आणि संवादसत्रांना हजेरी लावली. या महोत्सवात सादर झालेल्या चित्रपटांमधून मराठी चित्रपटसृष्टीतील आशयवैविध्य, प्रयोगशीलता आणि अभिव्यक्तीचे वेगवेगळे प्रवाह अनुभवायला मिळाले. चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ, अभ्यासक आणि जाणकारांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न आपण विविध सत्रांमधून केला. मराठी चित्रपटांचे विपणन आणि प्रसिद्धीतंत्र, जागतिक स्तरावर मराठी सिनेमाची ओळख, साहित्यकृतींचे चित्रपटांत रूपांतर, ग्रामीण भागातील चित्रपट निर्मिती, ओटीटीचे बदलते स्वरूप, स्त्री कलाकारांचे योगदान अशा विविध विषयांवर या महोत्सवात चर्चा झाली. ध्वनी, छायाचित्रण, नृत्यदिग्दर्शन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या विषयांवरील कार्यशाळांमधून प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन या महोत्सवात मिळाले. 'पुस्तक ते सिनेमा' या उपक्रमातून साहित्य आणि चित्रपट या दोन सर्जनशील माध्यमांमधील नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या महोत्सवात झाला, असे सांगत व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी महोत्सवाच्या यशाचे श्रेय प्रेक्षकांना दिले. या महोत्सवासाठी संकलित झालेले नोंदणी शुल्काची रक्कम ५ लक्ष रुपये दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी याप्रसंगी केली. त्या पुढे म्हणाल्या की, उत्तम चित्रपट निर्माण होणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणेही महत्त्वाचे आहे. चित्रपताकाने त्यासाठीचे व्यासपीठ मराठी चित्रपटांना उपलब्ध करून दिले आहे. दर्जेदार चित्रपटांना योग्य प्रसिद्धी मिळाली, त्यांची प्रेक्षकांशी प्रभावी जोडणी झाली आणि त्यांना प्रदर्शनासाठी योग्य संधी उपलब्ध झाल्या, तर मराठी चित्रपटांचा आवाका अधिक व्यापक होऊ शकतो. हे ‘चित्रपताका’ महोत्सवाने अधोरेखित केले आहे. महाराष्ट्र शासन चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असून सांस्कृतिक कार्य विभाग आणि मा. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या सांस्कृतिक धोरणांना पूरक ठरणारे, चित्रपटसृष्टीच्या गरजांशी जोडलेले आणि प्रत्यक्ष कलाकार-तंत्रज्ञांपर्यंत पोहोचणारे उपक्रम राबवण्याचा महामंडळाचा प्रयत्न कायम राहील. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या महोत्सवाच्या संकल्पनेला दिलेले प्रोत्साहन आणि वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे सहकार्य यामुळे आयोजनाला पाठबळ मिळाले, असे नमूद करून स्वाती म्हसे-पाटील म्हणाल्या की, कोणत्याही महोत्सवाचा समारोप म्हणजे त्या उपक्रमाचा शेवट नसतो. उलट पुढील वाटचालीचा विचार करण्याची ती योग्य वेळ असते. चित्रपताकाचे दुसरे पर्व यशस्वीरीत्या पार पडत असताना आता या महोत्सवाचे सातत्य राखणे आणि तिसऱ्या पर्वात त्याचा आशय व आवाका अधिक समृद्ध करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी प्रास्ताविकात महोत्सवाच्या प्रवासाचा आढावा घेतला. केवळ मराठी भाषेतील चित्रपटांना समर्पित असलेला हा उपक्रम आता एक स्वतंत्र ब्रँड म्हणून ओळख निर्माण करत असल्याचे त्यांनी म्हटले. महोत्सवातील प्रत्येक उपक्रमाचा अनुभव प्रेक्षकांसाठी वेगळा आणि नवा ठरल्याचेही त्यांनी सांगितले. ते यावेळी म्हणाले की, महोत्सवाच्या चार दिवसांत झालेली वैचारिक देवाणघेवाण, चित्रपटांचा अनुभव आणि विविध मान्यवरांकडून मिळालेले मार्गदर्शन दीर्घकाळ स्मरणात राहील. यंदाच्या महोत्सवातून मराठी चित्रपटांच्या आशयवैविध्याचे, कलात्मक सामर्थ्याचे, तांत्रिक प्रगतीचे आणि जागतिक स्तरावर पोहोचण्याच्या क्षमतेचे दर्शन घडले. मराठी चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे, या दृष्टीने या महोत्सवातील चर्चा चित्रपटसृष्टीतील बदलते प्रवाह समजून घेणे, नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे, दर्जेदार आशय निर्माण करणे आणि उपयुक्त ठरतील. या महोत्सवाच्या माध्यमातून निर्माण झालेली ऊर्जा आणि संवाद यांचे सातत्य पुढील काळातही टिकून राहावे, ही अपेक्षा व्यक्त करून त्यांनी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले.महोत्सवाच्या दुसऱ्या पर्वाचे क्युरेटर डॉ. संतोष पाठारे यांनी या महोत्सवातील चित्रपट निवडीमागील भूमिका स्पष्ट केली. तर महोत्सवाच्या दुसऱ्या पर्वाचे संचालक पुरुषोत्तम बेर्डे यांनी मराठी चित्रपटांना अधिकाधिक प्रेक्षक मिळवून देण्याची गरज अधोरेखित केली. या महोत्सवासाठी अनेक कलाकार आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांकडून मिळालेल्या सहकार्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी महोत्सवाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आनंद व्यक्त केला. विशेषतः चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी दाखवलेला उत्साह ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तर ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी मराठी चित्रपटांसाठी अशा महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले. साहित्य संमेलन आणि नाट्यसंमेलनाप्रमाणेच मराठी माणसांचे चित्रपट संमेलन इतक्या उत्तम पद्धतीने आयोजित होत असल्याचे पाहून आनंद वाटत असल्याचे ते म्हणाले. चित्रपट तयार करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना तो दाखवणेही महत्त्वाचे आहे, हे या महोत्सवाने अधोरेखित केले असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटविषयक कार्यशाळा आणि उपक्रमांमुळे या क्षेत्रातील संवादाला चालना मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र माझ्या नजरेतून’ या लघुपट स्पर्धेतील विजेचे कृष्णा लिंबराज ओव्हाळ आणि ऐइबत शेख या दोन लघुपटकर्त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.  समारोप सोहळ्याला ‘गणा धावरे’ या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह या चित्रपटातील कलाकार सूरज सिंग, अवनी सक्सेना, प्रणाली घोगरे, चैतन्य राणे उपस्थित होते. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग यामुळे संस्मरणीय ठरलेल्या या महोत्सवाची सांगता ‘गोंधळ’ चित्रपटाच्या प्रदर्शनाने झाली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...