पैंजणाच्या नादात फुलणार एक प्रेमकहाणी!साईरत्न एंटरटेनमेंटचे 'पैंजण' गाणे प्रदर्शित.

डोंगरदऱ्या, हिरवीगार शेतं आणि गावाकडचं सुंदर वातावरण… अशा निसर्गरम्य परिसरात फुलणारी प्रेमकहाणी सांगणारं साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘पैंजण’ हे गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात अक्षय वाघमारे आणि रुचिरा जाधव ही नवी जोडी पाहायला मिळत आहे. पैंजणाच्या नादात उमललेलं प्रेम, एकमेकांबद्दलची ओढ आणि दोघांमधील सुंदर केमिस्ट्री गाण्यातून दिसते. तसेच त्यांच्या प्रेमाचे क्षण, गोड नोकझोक आणि एकमेकांबद्दल वाटणारी ओढही गाण्यात पाहायला मिळते. ‘पैंजण’ या गाण्याला रोहित नागभिडे यांचे मधुर संगीत लाभले आहे. तर आनंदी जोशी आणि हर्षवर्धन वावरे यांच्या सुरेल आवाजाने हे गाणे सजले असून डॉ. विनायक पवार यांनी गाण्याचे शब्द लिहिले आहेत. सूरज राजपूत दिग्दर्शित या गाण्याचे संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर निर्माते आहेत. 
दिग्दर्शक सूरज राजपूत म्हणतात, “‘पैंजण’ ही निसर्गरम्य वातावरणात फुलणारी प्रेमकहाणी आहे. या गाण्यातून प्रेमातील निरागसता, हळवे क्षण आणि दोन मनांमधील ओढ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अक्षय आणि रुचिराने आपल्या अभिनयातून ही केमिस्ट्री अतिशय छान पद्धतीने साकारली आहे. तसेच संगीत टीमही कमाल आहे. मला आशा आहे, प्रेक्षकही या गाण्यातून आपल्या प्रेमाच्या आठवणींशी जोडले जातील,'' 
   संगीतकार रोहित नागभिडे म्हणतात, “प्रेमगीत तयार करताना त्यातील भावना सुरांमधून व्यक्त होणं महत्त्वाचं असतं. ‘पैंजण’साठी संगीत देताना त्यातील ग्रामीण बाज, प्रेमाची हळुवार भावना आणि गाण्याचा गोडवा यांचा सुंदर मेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे. आनंदी जोशी आणि हर्षवर्धन वावरे यांच्या आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच उंची मिळाली आहे.”
या गाण्याचे निर्माते संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर म्हणतात, “मराठी गाण्यांमधून वेगवेगळे विषय आणि भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. ‘पैंजण’मधील ग्रामीण वातावरण आणि प्रेमाची साधी, सुंदर मांडणी प्रेक्षकांना नक्कीच भावेल.”

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...