"प्रयोगशीलतेनेच मराठी सिनेमा जागतिक स्तरावर जाईल"दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचे प्रतिपादन.

पाश्चिमात्य चित्रपटसृष्टीत निर्माता केवळ आर्थिक गुंतवणूक करणारा नसतो, तर चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर सहभागी होऊन तो पूर्णत्वास नेण्याची जबाबदारीही पार पाडतो. याउलट मराठी चित्रपटसृष्टीत अनेकदा निर्मात्याची भूमिका केवळ आर्थिक पाठबळ देण्यापुरती मर्यादित राहते आणि निर्मितीशी संबंधित अनेक जबाबदाऱ्या दिग्दर्शकावर येतात, अशी खंत प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. मंगळवारी ‘चित्रपताका’ महोत्सवात ‘जागतिक क्षितिजावर मराठी सिनेमा... अनुभव एका दिग्दर्शकाचा!’ हे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचे विशेष संवादसत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 
सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सवाचे १५ नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचा हा अधिकृत महोत्सव प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात संपन्न होत आहे. या चार दिवसीय महोत्सवात मंगळवारी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी आपल्या चित्रपट निर्मितीच्या प्रवासातील अनुभव, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधील सहभाग आणि मराठी सिनेमाच्या जागतिक विस्ताराच्या शक्यता यांविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मराठी चित्रपटांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी आशयपूर्ण कथा, वेगळा दृष्टिकोन आणि प्रयोगशीलता आवश्यक आहे. मनात काहीतरी वेगळे करण्याची प्रामाणिक इच्छा असेल, तर जगाच्या विविध भागांतून त्यास मदत मिळत जाते. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील माणूस हा भावनांच्या पातळीवर सारखाच असतो. त्यामुळे स्थानिक अनुभव आणि संवेदनांमधून साकारलेल्या कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंतही प्रभावीपणे पोहोचू शकतात. मराठी चित्रपटांनाही याच मानवी भावविश्वाच्या बळावर जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये स्थान मिळवता येईल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले की, चित्रपट निर्मिती करताना प्रेक्षकांच्या अपेक्षांचाही विचार महत्त्वाचा असतो. प्रेक्षक आपल्याकडे एका विशिष्ट अपेक्षेने पाहत असतात. आपण काहीतरी चांगले आणि वेगळे निर्माण करावे, ही त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे नव्या गोष्टींकडे पाहण्याचा आणि त्या साकारण्याचा दृष्टिकोन विकसित होतो, असेही ते यावेळी म्हणाले.आंतरराष्ट्रीय महोत्सवांतील आपले अनुभव सांगताना ते म्हणाले की, पाश्चिमात्य प्रेक्षकांना मराठी चित्रपटांमधील रंगसंगती आणि दृश्यवैविध्य आकर्षित करते. भारतीय संस्कृती मुळातच रंगांनी समृद्ध असल्यामुळे आपल्या चित्रपटांमध्ये हे रंगवैविध्य स्वाभाविकपणे उतरते, हे त्यांना समजावून सांगावे लागते, हे नमूद करून ते म्हणाले, जगभरातील वेगवेगळ्या प्रेक्षकांचा चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिग्दर्शकाने समजून घेणे आवश्यक आहे. प्रयोग करताना चुका होण्याची भीती बाळगू नये; कारण प्रयोगशीलतेतूनच अनेकदा चांगल्या कलाकृती जन्माला येतात. या सिनेसमृद्ध करणाऱ्या संवादसत्रात सिनेकर्मी आणि सिनेरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...