तेजस देऊस्करांच्या आगामी हॉरर फँटसी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.
मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर नवनवीन प्रयोग होत असतानाच, आता प्रेक्षकांना भय, कल्पनारम्यता आणि गूढतेचा अनोखा अनुभव देणाऱ्या हॉरर फँटसी चित्रपटाची उत्सुकता लागणार आहे. ‘बकेट लिस्ट’ आणि ‘देवमाणूस’ या चित्रपटांतून आपल्या दिग्दर्शनाची वेगळी छाप उमटवणारे तेजस प्रभा विजय देऊस्कर आता एका अनोख्या कथाविश्वातून प्रेक्षकांना भेटायला सज्ज झाले आहेत. त्यांच्या आगामी हॉरर फँटसी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला असून लवकरच या चित्रपटाचे नावही जाहीर करण्यात येईल. यात सोनाली कुलकर्णी, सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हॉरर आणि फँटसी या दोन जॅानरची सांगड घालत प्रेक्षकांना नेमका कोणता अनुभव मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. चित्रपटाच्या कथानकाबाबत अधिक माहिती समोर आलेली नसल्याने या नव्या विश्वातील रहस्य उलगडण्याची प्रतीक्षा आता प्रेक्षकांना करावी लागणार आहे. भयाच्या वातावरणासोबत कल्पनाशक्तीला नवी दिशा देणारा हा चित्रपट मराठी सिनेमातील वेगळ्या विषयांच्या प्रवाहात महत्त्वाची भर घालण्याची शक्यता आहे. चित्रपटाचं नाव आणि कथानकाविषयीची माहिती लवकरच समोर येणार असल्याने या आगामी चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले आहे. नितीन वैद्य प्रॉडक्शन्स आणि रियान राय मोशन पिक्चर्स (युके) यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती होत आहे. नितीन वैद्य आणि जितेंद्र राय हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर सांगतात, “प्रत्येक चित्रपटातून प्रेक्षकांना काहीतरी वेगळं अनुभवायला मिळावं, हा माझा नेहमीच प्रयत्न असतो. या चित्रपटाची संकल्पना आणि त्यातून आकाराला येणारं कथाविश्व मला विशेष भावलं. हॉरर फँटसी हा जॅानर आपल्याला वास्तवाच्या पलीकडे जाऊन अनेक शक्यता तपासण्याची संधी देतो. त्यामुळे या चित्रपटातून केवळ भयाचा अनुभव न देता प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कथेतली वैशिष्ट्यं प्रेक्षकांसमोर उलगडण्यासाठी मीही उत्सुक आहे.”
निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणतात, “मराठी चित्रपटसृष्टीत आशयपूर्ण कथांसोबतच वेगळ्या जॅानरवरही प्रयोग होत आहेत आणि प्रेक्षकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाकडे पाहाण्याचा तेजस देऊस्कर यांचा अनोखा दृष्टिकोन आम्हाला खूप भावला. हॉरर फँटसीसारख्या वेगळ्या जॉनरमधील हा चित्रपट प्रेक्षकांना नवा अनुभव देईल, असा आम्हाला विश्वास आहे.”
निर्माते जितेंद्र राय म्हणाले, “या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळं कथाविश्व प्रेक्षकांसमोर आणण्याची संधी मिळत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. सोनाली कुलकर्णी, सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील यांसारख्या प्रतिभावान कलाकारांचा सहभाग या प्रकल्पासाठी महत्त्वाचा आहे. उत्तम कलाकार आणि तंत्रज्ञांच्या साथीने साकारत असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नक्कीच काहीतरी वेगळं घेऊन येईल, अशी आशा आहे.”
मुहूर्तासह या नव्या चित्रपटाच्या प्रवासाला सुरुवात झाली असून, त्याच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. कथानकाविषयीची माहिती आणि पुढील घोषणांकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. गूढतेची चाहूल देणाऱ्या या आगामी चित्रपटातून तेजस देऊस्कर कोणतं नवं विश्व उभं करतात, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा