‘पुस्तक ते सिनेमा’ उपक्रमात साहित्यिकांना आपल्या साहित्यकृती सिनेकर्मींपुढे मांडण्याची मिळाली संधी.

 ‘चित्रपताका’ महोत्सवात सोमवारी ‘पुस्तक ते सिनेमा’ या उपक्रमातून मराठीतील साहित्यिक आणि सिनेरसिकांना एकाच व्यासपीठावर येऊन संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी निवडक प्रकाशित मराठी पुस्तकांच्या लेखकांनी त्यांच्या साहित्यकृती उपस्थित सिनेकर्मींपुढे मांडत दिग्दर्शक, निर्माते व पटकथाकारांना या साहित्यकृतींचा परिचय करून दिला.
सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने १५ नोव्हेंबरपासून आयोजित ‘चित्रपताका’ या चार दिवसीय महोत्सवात सोमवारी ‘पुस्तक ते सिनेमा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चित्रपट किंवा वेबमालिकेत रूपांतरित होण्याची क्षमता असलेल्या प्रकाशित मराठी पुस्तकांच्या लेखकांना चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथाकारांसमोर त्यांच्या साहित्यकृतीचे सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली. यावेळी रोहन किरण क्षीरसागर (‘सात एकम्’), अक्षय मोहिते (‘बिल्लाबाँग’), शर्मिला फडके (‘फोरसिझन्स’), क्षितीज देसाई (‘शीतपेटीतून जेव्हा जाग येते...’), हीना कौसरखान (‘स्टीअरिंग’), अंबर हडप (सुहास शिरवळकर कृत ‘काळंशार’), रोहन देसाई (पंकज भोसले कृत ‘शृंगाराचा बादशहा’), प्राची बापट (सानिया कृत ‘स्थलांतर’), डॉ. स्मिता दातार (‘फक्त तिच्यासाठी’), विवेक कुडू (‘चार चपटे मासे’) यांनी साहित्यकृतींचे सादरीकरण केले. साहित्यकृतींचे कथानक, सिनेमाध्यमात रूपांतरित होण्याची क्षमता याबद्दल त्यांनी उपस्थित सिनेकर्मींशी संवाद साधला.  
    यावेळी सत्राचे अध्यक्षस्थान राज्याचे माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे यांनी भूषवले. अशा उपक्रमांतून साहित्य आणि सिनेमा यांचा अनुबंध जुळून उत्तमोत्तम कथानके सिनेमाध्यमातून प्रेक्षकांसमोर येण्याच्या प्रक्रियेला चालना मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले. चांगला सिनेमा बनण्यासाठी चांगल्या कथेची गरज असते. मराठी साहित्यात अशा चांगल्या कथा असलेली अनेक पुस्तके आहेत. त्यांच्यावर चित्रपट बनायला हवेत, असे प्रतिपादन करून ते म्हणाले की, मराठी साहित्याच्या सिनेमाध्यमांतराला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यादृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. याप्रसंगी उपक्रमाच्या परीक्षण समितीचे सदस्य श्रीकांत बोजेवार, गणेश मतकरी यांच्यासह समन्वयक लीना खोब्रागडे, मंगेश जोशी, तसेच दिग्दर्शक अजित भुरे, सुहृद गोडबोले, शिरीष राणे आदी मान्यवरांसह सिनेरसिक उपस्थित होते. 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण.

नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते "भाटा" चित्रपटाचे पोस्टर लाँच.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...