मराठी सिनेमाला भाषेच्या सीमा ओलांडण्यासाठी हवे पाठबळ.
मराठी चित्रपटांमध्ये आशय आणि कलात्मकतेची ताकद असूनही ते व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी वितरणव्यवस्था, आर्थिक पाठबळ आणि नावीन्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे, असा सूर ‘पैलतिरावरून मराठी सिनेमा... अमराठी दृष्टीतून मराठी सिनेमाचा आलेख’ या परिसंवादात उमटला. दिग्दर्शक नितीन कक्कर, अमित राय आणि सूरज सिंह यांनी या चर्चेत सहभाग घेतला. महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर आणि सिनेअभ्यासक व महोत्सवाचे क्युरेटर डॉ. संतोष पाठारे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सवाचे १५ नोव्हेंबरपासून आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचा हा अधिकृत महोत्सव प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात संपन्न होत आहे. या चार दिवसीय महोत्सवात मंगळवारी ‘पैलतिरावरून मराठी सिनेमा...’ हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहभागी अमराठी सिनेकर्मींनी मराठी सिनेमाच्या वर्तमानाविषयीची निरीक्षणे मांडत मराठी सिनेमाच्या विस्ताराच्या दृष्टीने त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. चित्रपटाला भाषेची मर्यादा नसते, असे सांगत दिग्दर्शक नितीन कक्कर यांनी यावेळी मराठी चित्रपटांतील कथा, संस्कृती आणि कलात्मकतेचे कौतुक केले. मात्र, उत्तम आशय असलेले चित्रपट योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी याप्रसंगी नमूद केले.तर दिग्दर्शक अमित राय यांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या समृद्ध परंपरेचा उल्लेख केला. मल्याळम चित्रपटसृष्टीप्रमाणे मराठी चित्रपटांनीही आपली सांस्कृतिक ओळख जपत देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे, असे ते म्हणाले. यासाठी मराठी चित्रपटांचे अन्य भाषांमध्ये डबिंग करून सबटायटल्ससह विविध माध्यमांवर प्रदर्शन करण्याची सूचना त्यांनी केली. तर निर्माता सूरज सिंह यांनी चांगल्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी योग्य आर्थिक पाठबळ आणि सक्षम वितरणव्यवस्था आवश्यक असल्याचे सांगितले. याशिवाय मराठी चित्रपटगृहांची घटती संख्या, प्रदर्शनातील अडचणी आणि निर्मात्यांना मिळणारे अपुरे पाठबळ यांवरही या परिसंवादात चर्चा झाली. मराठी सिनेमाचा विस्तार केवळ आशयाच्या बळावर नव्हे, तर निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या सर्वंकष प्रयत्नांतूनच शक्य असल्याचे या चर्चेतून सहभागींनी अधोरेखित केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा