सौंदर्यापेक्षा अभिनय हीच अभिनेत्रीची खरी ओळख.
अभिनेत्री होण्याचा प्रवास पडद्यावर नायिका म्हणून झळकण्यापुरता मर्यादित न राहता, साकारत असलेल्या भूमिकांतून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याबरोबरच त्यातून ‘स्व’भान देणाराही तो प्रवास असतो. सौंदर्यापेक्षा अभिनयाला महत्त्व देण्याचा, प्रतिकूल परिस्थितीतही कलेशी असलेले नाते टिकून ठेवण्याचा आणि प्रत्येक भूमिकेतून स्वतःला नव्याने शोधण्याचा मराठी सिनेमाच्या नायिकांचा हा प्रवास सोमवारी ‘चित्रपताका’ महोत्सवात आयोजित ‘तिचं ‘नायिका’ होणं!’ या विशेष परिसंवादात उलगडला. महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपट महोत्सव असलेला ‘चित्रपताका’ हा चार दिवसीय महोत्सव प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे १५ नोव्हेंबरपासून आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी या महोत्सवातील ‘तिचं ‘नायिक’ होणं!- भूमिकांचे भान आणि ‘स्व’ची ओळख’ या परिसंवादात ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासह छाया कदम आणि सायली संजीव यांनी सहभाग घेत आपल्या अभिनयप्रवासातील चढ-उतार, वैयक्तिक अनुभव, संधी आणि आव्हाने यांचा वेध घेत त्यांची नायिका म्हणून घडत जाण्याची प्रक्रिया उलगडली. यावेळी वरिष्ठ पत्रकार संजय आवटे आणि निवेदक मृण्...